महाराजांच्या कुळाचा इतिहास
इतर सिद्ध, महात्मे, संत, भगवद्भक्तांच्या कुलपरंपरेची वैशिष्ट्ये व साधर्म्य - महाराजांच्याही मागील एकवीस पिढ्यांमध्ये भगवद्भक्तीची परंपरा [संदर्भ - बेलसरेंचे पुस्तक इ.] त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे सात्विक, उदार, समाधानी स्वभाव
महाराजांच्या कुळाची पार्श्वभूमी -
महाराजांचे पूर्वज, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील, ग्रामीण भागात राहात होते. त्यांचे आडनाव ‘घुगरदरे’. ते वसिष्ठगोत्री, शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण होते.
व्यवसाय (वृत्ती) - त्यांची ‘कुळकर्णी’पणाची वृत्ती होती. माण तालुक्याचे मुख्य कुळकर्णी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. इतर कुळकर्ण्यांच्या तंट्यांसाठी ते न्यायदान करीत. हा न्याय देताना ते कुशलतेने, समजुतदारपणे व निष्पक्षपातीपणे वागून करीत. ते मुख्यत: शेती करीत. शेतामध्ये स्वत: खपत असत.
धार्मिक परंपरा -
महाराजांचे पूर्वज मोठे भगवद्भक्त असून, दर शुद्ध एकादशीला पंढरीची वारी अगदी नियमाने करीत. त्यांचा भागवत संप्रदाय होता. ते अती सात्विक स्वभावाबद्दल व मनाच्या उदारपणाबद्दल प्रसिद्ध होते. प्रापंचिक घडामोडींबरोबर परमेश्वराची भक्ती अतिशय मनापासून केली जात असे. ते प्रामाणिक व परोपकारी होते. पहाटे पांडुरंगाचे नामस्मरण, सकाळी स्नान व प्रात:संध्या, देवपूजा, भगवद्गीतेच्या एका अध्यायाचे पठण करीत असत. दुपारी पुराणश्रवण करीत, संध्याकाळी सायंसंध्या करीत व हरिपाठ म्हणत असत. रात्री फराळ केल्यावर टाळ-वीणा- मृदुंगावर रोज पंचपदी भजत करीत असत. रात्री पाच-सहा तासांपर्यंतही हे भजन चालत असे. ते गळ्यात तुळशीची माळ घालून मुद्रा लावेत व तोंडाने पांडुरंगाचे नामस्मरण करीत असत. त्यांना वारीला जाणे अशक्य झाल्यानंतर, दृष्टांत देऊन पांडुरंग-रखुमाई मूर्तीरुपाने त्यांच्या मळ्यामध्ये कायमस्वरूपी वास्तव्याला आले. ते कधी खोटे बोलले नाहीत, त्यांनी कधी कोणाला फसवले अथवा लुबाडले नाही. त्यांनी परद्रव्याला चुकूनही कधी हात लावला नाही.
त्यांच्या घरातील स्त्रियांचा स्वभाव उदार, भोळा, शांत, समाधानी, निरलस, आर्जवी, समजुतदार असे. स्त्रियांमध्ये भांडण-तंटे नसत. घरातील जबाबदार्या त्या उत्तमप्रकारे पार पाडीत असत. घरातील वृद्ध, पाहुणेमंडळी, नोकर-चाकर, गुरेढोरे या सर्वांकडे घरातील स्त्रियांचे जातीने लक्ष असे. घरातील स्त्रिया अतिशय सढळ हाताने सर्वांना मदत करीत असत. त्यांच्या तोंडी सतत नामस्मरण असे.
हे वाचून मला काय वाटले?
हल्ली असं वातावरण पहायला-ऐकायला सुध्दा मिळत नाही. अशा वातावरणात संत जन्माला येणं साहजिक आहे. सध्या संत का दिसत नाहीत याचं कारण, अशी भक्तीची परंपरा असलेली घरं कुठं आहेत असं माझ्या मनात येऊन गेलं.
आपल्या घरात शक्य तितकं पवित्र वातावरण ठेवायचं, सर्वांना ते वातावरण टिकविण्यासाठी विनंती करायची असे ठरवून तसे मी वागणे प्रथम सुरू केले.
॥श्रीराम समर्थ॥