महाराजांच्या जन्माचे वैशिष्ठ्य

महाराजांच्या जन्माचे वैशिष्ठ्य -
महाराजांचे वडील गंभीर आणि नियमी होते. बाहेरून दिसायला साधे पण अंतर्यामी अती विरक्त, नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे. ते प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसत.

त्यांची आई, गीताबाई अतिशय आर्जवी होत्या. सासू-सासर्‍यांच्या लाडक्या होत्या. अतिशय कर्तबगार आणि प्रेमळ होत्या. गावात कुणी आजारी असेल तर त्या स्वत: जाऊन त्याचे औषधपाणी करीत असत. त्या गरीब कुटुंबांची बाळंतपणे करीत, त्यांना औषधपाणी, तूप, दही, लोणी, कपडा पुरवीत.
गोंदवल्यापासून जवळ राहात असलेल्या संभाजी नावाच्या मौनी सत्पुरुषाकडून महाराजांच्या आई-वडिलांना प्रसाद म्हणून एक नारळ व आशीर्वाद मिळाला होता.
गीताबाईंचे गर्भारपण -

  • त्यांचा अखंड रामनामाचा सपाटा चालू असे,
  • त्या दासबोधाचे श्रवण करीत असत,
  • त्या श्रीसमर्थांचे दर्शन घेत असत,
  • बसल्याबसल्या त्यांची तंद्री लागे व कानात कुणी रामनाम घेत आहे असे त्यांना स्पष्ट ऐकू येई,
  • त्यांची वृत्ती विलक्षण प्रसन्न झाली,
  • त्यांच्या चेहर्‍यावर निराळेच तेज दिसू लागले,
  • आपण रामनाम घेतो म्हणून श्री मारुतीराय आपल्याबरोबर राहून आपले रक्षण करतात, असे त्यांना वाटू लागले. मग त्या श्री मारुतीरायांचे ध्यान करू लागल्या.
  • पहिलेच बाळंतपण असूनही त्यांच्या सासर्‍यांनी त्यांना माहेरी न पाठवता, त्यांच्या आई-वडिलांनाच बोलावून घेतले.
  • आठवा महिना संपण्याच्या सुमारास, एके दिवशी संध्याकाळी, एक तेजस्वी बैरागी त्यांच्याकडे रात्रीच्या वस्तीला आला. गीताबाईंनी त्याला नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्या बैराग्याच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले व तो म्हणाला, “मेरे लाला, तू यहॉं है? तेरे दर्शनसे मैं धन्य हुआ हूं । अब मैं वापस जाता हूं ।” रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला.
  • माघ महिन्यातील शुद्ध एकादशीला (इ. स. १८४५) विठोबाची षोडशोपचार पूजा झाली. गीताबाईंनी तीर्थ घेऊन थोडा फलाहार केला. थोडी विश्रांती घेतली. तिन्हीसांज टळल्यावर त्यांनी सुईणीला बोलावून घेतले. त्या तोंडाने नामस्मरण करीतच होत्या. बाहेर एकादशीचे भजन चालू होते. कळा चालू असताना त्यांनीच सासूबाईंना व आईला धीर दिला. पहाटे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि माघ शुद्ध द्वादशीला, बुधवारी पहाटे, सूर्योदयाच्या सुमारास महाराजांचा जन्म झाला.
  • त्यांच्या आजोबांनी प्रेमाने पांडुरंगावर फुले उधळली व गावात साखर वाटली. ज्योतिषीबुवांनी कुंडली मांडली, वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी बाळाला आशीर्वाद दिला.


---------------------------------
हे वाचून मला काय वाटलं?

- अवतारी मनुष्याच्या घरातील वातावरण इतर सर्वसामान्य घरातील वातावरणापेक्षा खूपच वेगळे असते.
- घरातील लोक अतिशय धार्मिक, श्रध्दावान, भाविक, तपोबलानेयुक्त शिवाय भूतदया, परोपकाराने समृध्द असतात.
- आईची भावनिक स्थिती इतर गर्भवती स्त्रियांपेक्षा खूपच वेगळी असते. तिला आपल्या उदरात परमात्मा आहे याची खात्री असते. ती त्याच्याच ध्यासात सतत असते.
- प्रसन्नचित्त, समाधानी, तेजस्वी, शांत, स्थिर अशी तिची मनःस्थिती वेगळीच.
- अवतारी बाळाचा जन्म अतिशय शुभमुहूर्तावर होतो

॥श्रीराम समर्थ॥