महाराजांचे बालपण

महाराजांचे बालपण

सर्वांच्या संमतीने महाराजांच्या आजोबांनी बाळाचे नाव ‘गणपति’ ठेवले.
त्यांचे रूप विशेष सुंदर होते. ते स्थूलदेही, गौरकाय, सुगठित, चांगले दणकट होते.

त्यांचे डोळे तेजस्वी, कपाळ भव्य असून त्यांना भरपूर जावळ होते. ते सर्वांचे अतिशय लाडके होते. ते खूप लवकर रांगू लागले, अतिशय चपळही होते. ते रांगत रांगत देवघरात जात व देवांना आसनावरून खाली काढत असत. कधी कधी गोठ्यातही जात असत.

आईने कडेवर घेऊनच फिरवावे, असा ते हट्ट करीत असत. त्यामुळे त्यांना सांभाळून जेवढे घरकाम उरकता येईल तेवढेच काम करण्याची परवानगी सर्वांनुमते त्यांच्या आईला मिळाली.

आजोबांचे रोज रात्रीचे भजन ऐकायला जाण्याचा ते हट्ट करीत असत. त्यांचे सर्व आवरणे, खाणे-पिणे इत्यादी आजोबा-आजी करीत असत. त्यांच्या जन्मवेळच्या सुईणीचे त्यांच्यावर फार प्रेम होते.
विशेष -

महाराज तीन वर्षांचे झाल्यावर, सर्वांची नजर चुकवून एकटेच बाहेर जात असत.
चौथ्या वर्षी सर्व धुळाक्षरे ते एका दिवसात शिकले. आजोबांच्या तोंडची गीता ऐकून ऐकूनच त्यांची पाठ झाली. आजोबांच्या पाठोपाठ बोबड्या आवाजात ते श्लोक म्हणत असत.

पाचव्या वर्षापासूनच ते आजोबांच्या बरोबरीने आसन घालून जप करू लागले. खाण्याबाबत त्यांची कधीही काही कुरकुर नसे. गावातील सगळ्या मुलांशी त्यांची मैत्री होती. त्यांचा आवाज फार गोड व बोलणे अतिशय प्रेमळ होते. ते आजोबांची खूप सेवा करीत. रात्रीचे भजन झाल्याशिवाय ते कधीही झोपले नाहीत. भजनामध्ये आजोबा नाचू लागले की ते पण नाचता नाचता तल्लीन होऊन जात.
पाचव्या वर्षी आजोबांनी एकदा त्यांची परीक्षा घेतली. त्यांना विचारले की, “खूप धन मिळाले, सत्ता मिळाली तर तू काय करशील?” त्यावर, “अपंग, गरीब, रोगी, भिकारी यांना ते द्रव्य देईन व कुणीही उपाशी राहाणार नाही असे अन्नछत्र घालीन”, असे उत्तर देऊन त्यांनी आजोबांना आनंदाश्चार्याचा धक्का दिला होता. आजोबांकडून त्यांने हरिभक्तांच्या कथा ऐकल्या, चरित्रे ऐकली. या कथा, चरित्रांवर त्यांनी खूप मनन केले.

सहाव्या वर्षी त्यांची मुंज झाली. मुंजीनंतर त्यांना ब्रह्मकर्म शिकवण्यासाठी कुलगुरु घरी येत असत. दोन महिन्यातच ते संध्या, पूजा, वैश्वदेव, पवमान, रुद्र इत्यादी शिकले. “यापुढचे वेद व शास्त्रे कमीत कमी वेळात मला शिकवा”, असे ते गुरुजींना म्हणाले.

रात्री-अपरात्री नदीकडील स्मशानाच्या बाजूला एका लहानशा गुहेत, एकांतात ते नामस्मरण करीत असत व पहाटेच्या सुमारास घरी येत असत.

सातव्या वर्षी गावातील शाळेत गुरुजींना येत असलेले सर्व काही त्यांचे ८-१० दिवसांतच शिकून झाले.
यानंतरचा त्यांचा काळ बाह्यत: दिशाहीन गेला. रोजचे पाठ शिकून झाल्यानंतर गावातील मुलांबरोबर हरतर्‍हेचे खेळ खेळणे, मोठमोठ्या झाडांवर चढून बसणे, पोहणे, कुस्ती खेळणे, घोड्यावर बसणे, दंड काढणे यांत त्यांचा हात कुणीही धरू शकत नसे.

खेळण्याच्या अधेमध्ये, ‘श्रीराम समर्थ’ असा कित्ता सर्व मुलांना ते गिरवायला देत असत. खेळण्यासाठी मुले जमल्यावर सर्वप्रथम ते मोठ्याने श्रीरामाचे भजन करीत.

-----------------------
हे वाचून मला काय वाटलं?

  • अवतारी व्यक्ती बालपणीच तेजस्वी दिसतात.
  • त्यांची बुध्दी असामान्य असते.
  • ते एकांतप्रिय असतात.
  • ते निर्भय असतात.
  • परमात्म्याचा ध्यास त्यांना बालपणापासूनच असतो.
  • ते मातृभक्त, सदाचरणी असतात.

॥श्रीराम समर्थ॥