महाराजांचा गुरूशोध

महाराजांचा गुरूशोध
(१८५७-५८-५९)
महाराजांच्या घराजवळ गांवचे मारूतिमंदिर आहे, तेथे वस्तीला येणार्‍या बैरागी-गोसावी-वारकरी-यात्रेकरू यांना महाराज भगवंताविषयी प्रश्न विचारीत. एका वृध्द रामदासीने जेव्हा त्यांना सांगितले की सद्गुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही,

तेव्हापासून त्यांच्या मनात सद्‌गुरुशोधाचे विचार थैमान घालू लागले.

एकदा, बरोबर दोन मित्रांना घेऊन ते पहाटे गुरुशोधार्थ निघाले आणि मजल दरमजल करीत कोल्हापूरला येऊन धर्मशाळेत राहिले. त्यातला एक मित्र लवकरच वाटेतून फिरला, दुसरा मित्र कोल्हापूरहून परत आला. घरच्या मंडळींनी कोल्हापूरला शोध केला तेव्हा एका निपुत्रिक दंपतीने त्यांना राजाच्या बडदास्तीत ठेवल्याचे दिसले. त्यांची समजुत काढून वडिल मुलाला घरी घेऊन आले.
घरी आल्यावर महाराजांचे सततचे रामाचे नामस्मरण व रात्रीचे ध्यान चालू राहिले.

त्यांच्या आजोबांनी महाराजांच्या लग्नाचा घाट घातला. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. थोड्याचे दिवसात त्यांचे आजोबा व आजी वारले. महाराज जास्तीत जास्त वेळ ध्यानस्थ राहू लागले.

एक दिवस आईला पूर्वसूचना देऊन महाराज गुरुशोधार्थ एका लंगोटीवर निघून गेले. त्य़ावेळी त्यांचे वय १२ वर्षांचे होते.

या काळात ते पोटापुरती माधुकरी मागत आणि संतसत्पुरुषाच्या दर्शनाला जात.
तो सत्पुरुष आपल्याजवळची विद्या त्यांना देई. पण त्याने त्यांचे समाधान होत नसे. अशा रीतिने त्यांनी परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक पाहिले.


महत्वाचे सिध्दपुरुष-साध्वी

- हरिपूरजवळील(कृष्णा व वेण्णा संगमाजवळील) राधाबाई
- मिरज येथील आण्णाबुवा
- देव-मामलेदार
- अककलकोटचे स्वामी श्रीसमर्थ
- हुमणाबादचे श्रीमाणिकप्रभू
- अबूच्या पहाडातील योगीराज
- काशीतील तेलंगस्वामी
- काशीतील षट्‌शास्त्रात पारंगत संन्यासी
- नैमिषारण्यातील गुहेमधील तपस्वी
- बंगालमध्ये श्रीरामकृष्ण
- दक्षिण हैद्राबादमध्ये श्रीसमर्थसंप्रदायातले मोठे सत्पुरुष श्रीरामकृष्णांचे प्रकटीकरण व येहळेगावच्या तुकारामचैतन्यांकडे जाण्याचा आदेश
- मराठवाड्यामध्ये नांदेडपासून जवळ येहेळगावी श्रीतुकारामचैतन्य हे महाराजांचे सद्‌गुरु
----------------------------
मला हे समजून घेऊन काय वाटले?
- एक लहान विवाहित मुलगा अपुरं शिक्षण, उपजिविकेचा पत्ता नाही, आईबापाचा लाडका, संपन्न घराण्यातला, एका लंगोटीनिशी बाहेर पडतो. अर्धा भारत पायी फिरतो. ज्याच्या घरी अन्नछत्र चालायचं तो माधुकरी मागून पोट भरतो....माझ्या तर पोटातच तुटलं. याला थंडीवारा लागला तर हा काय करत होता? भूक लागली तर काय करत होता? आईची आठवण आली तर काय करत होता? पावसात भिजला तर कोठे आसरा शोधत होता? वाईट माणसांपासून याचं कोण रक्षण करीत होतं? खरोखर रामानंच याचं योगक्षेम पाहिलं आणि आपल्या वचनाला भगवंत जागला. म्हणून महाराज एवढे छातीठोकपणे रामनाम घ्या आणि बाकी त्याच्यावर सोडा असं सांगतात.
- या मुलाला टोकाचं समाधान हवं होतं -अधलंमधलं किरकोळीतलं न टिकणारं काही नको होतं, त्यासाठी काहीही करायची तयारी याची होती. (आपणही असे प्रयत्न करतो पण ते परमात्मा मिळण्यासाठी नाही.) म्हणून महाराज म्हणतात की प्रपंचातलं किरकोळ रामाकडे मागू नका त्यानं समाधान नाही मिळणार.
समाधान - तेही कायमचं टिकणारं हवं असेल तर परमात्म्याच्या प्राप्तीचाच ध्यास घ्या.
आपल्यालाच परमात्म्याची नड/गरज भासत नाही जेवढी प्रपंचातल्या गोष्टींची भासते. म्हणून आपण राम मिळवण्य़ासाठी त्यांच्या एवढे कासावीस होत नाही.
त्यामुळे आपण त्यांच्याइतके शांत-समाधानी-आनंदी होत नाही.

॥श्रीराम समर्थ॥