अनुग्रहानंतरची अवस्था व तीर्थाटन

अनुग्रहानंतरची अवस्था व तीर्थाटन -

येहेळेगाव सोडल्यावर श्रीतुकामाईंबरोबर उमरखेड ते आले. तेथे श्रीचिन्मयानंदस्वामींचे दर्शन व आशीर्वाद त्यांनी ग्रहण केले.
श्रीतुकामाईंच्या सूचनेनुसार महाराजांचा एकांतवास सुरु झाला.

त्यांनी उज्जैनपर्यंत पायी प्रवास केला. तेथील मोठ्या अरण्यातील गुहेमध्ये बराच काळ त्यांनी एकांतवासात आत्मचिंतन केले. त्यावेळी एका गाईने सकाळ-संध्याकाळ येऊन त्यांना दूध पाजले.

नंतर नैमिष्यारण्यात २ वर्षे इतर ६ ध्यानमग्न सिध्दपुरुषांसमवेत गुहेत ध्यानावस्थेत महाराज होते.
नैमिषारण्यात भूमिगत झालेल्या श्री नानासाहेब पेशवे यांना त्यांनी अभय दिले.
अयोध्येत रामशास्त्रीबुवांचा मनोपालट त्यांनी केला व रामनामासाठी प्रेरित केले.

काशीमध्ये त्यांनी अनेकांना जीवनदान दिले, संततीसाठी आशीर्वाद दिले.
नंतर ते प्रयागमध्ये आले.
नंतर मथुरा-वृंदावन पाहिले व श्रीकृष्ण भगवानाचे जन्मस्थल व रासकीडा स्थली पाहिली.

कलकत्याला धनाढ्य कुटुंबाकडून त्यांनी हरिहाट करविला.
सातपुडा पर्वताच्या सन्निध्यात ते आले. नर्मदेच्या काठाकाठाने त्यांनी प्रवास केला.
नंतर ते इंदूर मध्ये आले तेथे ते ६ महिने सहजसमाधीच्या स्थितीत होते. त्यावेळी एका गवळ्याने त्यांची सेवा केली.
भोंदू लोकांविषयी चीड असलेल्या जिजीने त्यांची अघोरी परीक्षा घेतली. नंतर तिला पश्चाताप झाला व ती संपूर्ण शरण गेली.

इंदूरच्या राजा शिवाजीराव होळकरांना महाराजांनी संकटसमयी धीर दिला व अभय दिले.

त्यानंतर ते गोंदावल्याला आले व त्यांनी मारूतिमंदिरात एक रात्र वास्तव्य केले. उदास अशा आपल्या आईवडिलांचे साधुरूपात त्यांनी सांत्वन केले.

खातवळला सासुरवाडीस येऊन त्यांनी सासू व पत्नीचे साधूरुपात सांत्वन केले व साधनेविषयी मार्गदर्शन केले.
डांबेवाडीस चुलतबहिणीकडे भिक्षेसाठी आले व त्यांनी आपल्या खर्याध स्वरुपाची तिला खूण दिली.
नंतर त्यांनी सज्जनगडावर तीन रात्र मुक्काम केला.
त्यानंतर त्यांनी रामेश्वरापर्यंत पायी यात्रा केली. श्रीरामेश्वराचे दर्शन घेतले. सोबतीला घेतलेल्या एका रोगी मरणासन्न भिकार्या्चे कल्याण केले.
त्यांनी कांचीला श्रीवरदराजाचे दर्शन घेतले. त्यांनी ३ दिवस एका साध्वीकडे तिच्या विनंतीवरून मुक्काम केला.
नंतर त्यांनी येहेळेगावला श्रीतुकामाईंचे दर्शन घेतले.
त्यांच्या अनुमतीने ते ९ वर्षांनी गोंदवल्याला घरी परत आले. तेव्हा ते २३ वर्षांचे होते.
------------------------------------------
हे सर्व अनेकवेळेला वाचून मला काय वाटले?

- सुमारे १५० वर्षांपूर्वी, केवळ एका लंगोटीवर कोणी साधू तीर्थाटन करीत असेल तर त्याची जीवनधारणा होण्याइतकी भिक्षा त्याने जाऊन मागावी अशी धार्मिक प्रवृत्तीची घरे भारतात होती. अजूनही श्रध्देने नर्मदा-परिक्रमा करणार्यांतना हा अनुभव येतो.
- सहज समाधि अवस्थेत योगीराजांचा देह सांभाळण्यासाठी परमेश्वर कोणाची ना कोणाची व्यवस्था करतो आणि या सेवेचे फळ त्याला मुक्तीरुपाने देतो.
- बाहेरील वेषावरून व वर्तनावरुन सिध्दसाधूची पारख करणे अवघड असते.
- खरा साधू त्याला कितीही अपमानित केलं गेलं तरी विकारवश होऊन शाप देत नाही. त्याची शांति-आनंद-समाधान अढळ रहाते.
- गरीब-श्रीमंत असा भेद महाराजांनी कृपा करताना केला नाही. ते संपूर्ण निस्पृह होते. इतरांचे कल्याण करताना कोणत्य़ाच प्रकारच्या परतफेडीची अपेक्षा त्यांनी केली नाही.
- एकदा परमात्मस्वरूप झाल्यावर मुक्त सिध्दपुरुषाला मृत्यूलोकातील सर्व सुखोपभोग कवडीमोल अनावश्यक वाटतात.
- इंदूरला लहान मुलांशी त्यांच्यासारखे वागून त्यांना परमार्थाचे साधन शिकवणे मला विशेष वाटले.
- सर्व परस्त्रियांना "माय" म्हणणे ही गोष्ट मला अतिविशेष वाटली.
- निर्गुण समाधीत राहूनही विविध तीर्थस्थानातील सगुणरूपातील परमात्म्याच्या विभूति त्यांना वंदनीय वाटल्या.
- सर्वांभूती रामस्वरूप पाहणारे महाराज ८ वर्षांनी घरी कुटुंबीयांना साधूरुपात भेटताना अविचल राहिले. घरच्या लोकांचे समाधान करणे, त्यांना नामस्मरणाचे महत्व सांगणे यावरच त्यांनी भर दिला.

॥श्रीराम समर्थ॥