गुरूआज्ञेने गृहस्थाश्रम

गुरूआज्ञेने गृहस्थाश्रम

एक लंगोटी नेसावी, मारुतिच्या देवळात रहावे, भिक्षा मागावी आणि रामनाम घ्यावे अशी इच्छा असलेल्या महाराजांनी गुरुआदेशानुसार आदर्श प्रपंच केला.
आत्मज्ञान झाल्यानंतर ब्रह्मचैतन्य हे गुरुने दिलेले नाम धारण करुन एकांतवास सेवून, तीर्थाटन करून महाराज परत घरी आले.

ते बैराग्याच्या वेषात असल्याने त्यांच्य़ा आईने त्यांना ओळ्खले नाही. महाराजांनीच ओळख दिल्यावर त्यांना खूण पटली आणि त्यांना अत्यानंद झाला.

सर्व कुटुंबीय, मित्र, आप्त यांच्या समवेत बसून महाराज त्यांचे अनुभव सांगू लागले की रात्र संपली तरी कळत नसे.
शेकडॊ लोक नंतर दर्शनाला येऊ लागले. महाराजांची लोकप्रियता वाढू लागली. वडीलांचा आदर राखून महाराजांनी शेजारच्या विठ्ठ्ल मंदिराट मुक्काम हलविला.
आप्तांच्या सांगण्यानुसार त्यांनी शास्त्रोक्त पध्दतीने होमहवनादि सर्व विधी करवून आपला जटाभार उतरविला व भरपूर अन्नसंतर्पण केले.
समारंभाला आलेल्या आपल्या सासर्‍यांसमवेत महाराज सासुरवाडी गेले व येताना आपल्या पत्नीला घरी घेऊन आले.
त्यांनी गृहस्थाचा वेष केला व ते घरीच जास्त काळ राहू लागले. आईवडीलांना त्यामुळे पुष्कळ आनंद झाला.
पहाटे उठून, आवरून ते प्रथम विठोबा-रखुमाईचे दर्शन घेत, नंतर ते आपल्या आईवडिलांच्या पाया पडत. काकडआरती करून थोडे भजन करीत.
८ वाजेपर्यंत ते दासबोधावर निरुपण करीत.
१०=३० ते ११ पर्यंत ते आलेल्या लोकांच्या अडचणींचे निवारण करीत. पुढे स्नान=संध्या करून देवाला तुळशीपत्र वाहत. नंतर भोजन व विश्रांती. दुपारी ३ वाजता विठोबाच्या मंदिरात पोथी वाचण्यास बसत. नाथभागवत, अध्यात्मरामायण, तुकोबांची गाथा किंवा तुलसीरामायण या पोथ्यांवर ते निरुपण करीत. त्यातील संतांचा संदेश ते श्रोत्यांना सांगत.
रात्री फराळ झाल्यावर मोठ्या प्रेमाने ते भजन करीत.
देवाची आरती करून आईबापांना नमस्कार करून ११ वा झोपण्यास जात.
महाराजांनी आपल्या प्रथम पत्नीला आदर्श गृहिणी, सून, पत्नी, भक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले. भगवत्‌भजन, नामस्मरण व अन्नदान यांनी घराला मंदिराची शोभा येते हे त्यांनी तिला प्रेमाने शिकवले.

आईच्या सांगण्यानुसार त्यांनी घरची कुलकर्णीपणाची वृत्तीही उत्तम सांभाळली.
महाराज आईच्या आज्ञेत असत. तिच्या गळी आपल्या आवडीची गोष्ट उतरवूनच प्रसंगी तिला न आवडणार्‍या गोष्टी त्यांनी केल्या.
प्रथम पत्नीला मॄत्यूसमयी उत्तम गति मिळण्याइतपत त्यांनी तिला योगाभ्यास व नामसाधन शिकवले.
तिच्या पासून झालेला मुलगा अल्पायुषी असणार याची त्यांनी तिला आधीच कल्पना दिली होती.

तिच्या वियोगानंतर काही कालानंतर आईच्या आग्रहाखातर स्वतःच अनेक बहिणींमधली सर्वात लहान व अंध मुलगी विवाह करून घेऊन आले.
या अंध पत्नीच्या सेवेला बायका ठेवून तिची उत्तम बडदास्त त्यांनी ठेवली.
तिच्यापासून झालेली तीनही मुलं अल्पावधीतच गेली.
ते इंदूरला असताना त्यांचे वडिल गेले. त्यांच्या उत्तरक्रिया करण्यासाठी ते परत गोंदवल्याला आले व सर्व विधी व्यवस्थित केले.
त्यांची १ बहिण व १ भाऊही गेला.
त्यांची आई दुःखाने खूप पोळली. या आईची त्यांनी खूप सेवा केली. तिचे दुःख हलके करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिची अंतिम वेळ जवळ आल्यावर त्यांनी खूप लोक बरोबर घेऊन काशी-प्रयाग-अयोध्या या यात्रेला आईला नेले. तिथे गंगास्नान, देवतादर्शन, खूप अन्नदान, दक्षिणादान तिच्याकडुन देववलं. त्यांच्याच मांडीवर त्यांच्या आईने अयोध्येत समाधानाने प्राण सोडला.

महाराजांनी आपली शेते, घरं, इस्टेट याकडे कधीही दुर्लक्श केले नाही. त्यांनी नवीन शेते घेतली, धर्मशाळा बांधल्या, देवळे बांधली, नवीन विहिरी खोदवल्या.
आल्यागेल्याला अन्नदान व नामस्मरण कधी चुकले नाही.
गावासाठी त्यांनी आठवड्याचा बाजार सुरु केला. त्यादिवशी गावजेवण घालण्याची प्रथा केली.
आडल्यापडल्याला कायम आधार दिला.
अनेकांची लग्ने, मुंजी, डोहाळजेवणे, बारशी, मृतांचे दिवस सुध्दा केले.
संसार त्यांनी कर्तव्य म्हणून कसा करावा याचा माझ्या सारख्या साधकांपुढे आदर्श घालून दिला.

-----------------------------------------------------------
हे सर्व वाचून मी काय शिकले?

• प्रपंचावरची प्रवचने वाचताना महाराजांचे चरित्रच माझ्या डोळ्यांपुढे होते.
• माझ्यामध्ये लक्षणीय बदल झाला. मी संसार अधिक दक्षतेने करू लागले. मी हे करीत असलेले महाराजांना आवडेल ना याचा विचार करू लागले.
• महाराजांना जे आवडेल तेच योग्य अशी माझी धारणा पक्की होत गेली.

॥श्रीराम समर्थ॥