महाराजांवरचे कसोटीचे प्रसंग (माझ्या दृष्टीने)
----------------------
१) अगदी लहानपणी नदीकाठी स्मशानाच्या बाजूला गुहेत रात्री ध्यानस्थ बसणं.
२) मास्तरांकडची विद्या संपल्याने फार लवकर शाळा सुटणं.
३) समवयस्क मुले रानात भोवताली जमवून रामभजनात गुंगल्याने चरायला नेलेल्या गुरांनी इतरांच्या शेतीची नासाडी करणं
व त्यांच्या तक्रारी आईकडे जाणं.
४) सद्गुरुशिवाय देवाचे दर्शन होत नाही व समाधान मिळत नाही हे कळल्यावर ८-९ वर्षे वय असताना बेचैनी येणं. - कदाचित गुरुशोधासाठी घर सोडावं लागेल, शोध लागेपर्यंत मैलोन्मैल फिरावं लागेल याची मानसिक तयारी होत असावी.
५) पहाटे २ मित्रांना घेऊन कोल्हापूरपर्यंत पायी जाणे, मंदिरात धर्मशाळेत रहाणं, जे मिळेल ते खाणं.
६) श्री सिध्देश्वर राजगुरुंनी अचानक रस्त्यातून उचलून घरी नेऊन राजोपचारात ठेवून दत्तकाची तयारी करणं.
७) ध्यानीमनी नसताना, इच्छा नसताना वडिलधार्यांच्या इच्छेखातर दहाव्या वर्षी लग्न होणं.
८) आधी आजोबा नंतर आजी पाठोपाठ जाणं, एकलेपणा येणं, कोणीच आपल्याला काय हवंय हे समजू शकत नाही, गुरुभेटीला उशीर होतोय याची खंत वाटणं, आणि त्यामुळे सद्गुरुभेटीची अजूनच ओढ वाटणं.
९) गुरुशोधासाठी फिरत असताना नैमिषारण्यातील त्या काळ्ची भयानक थंडी, सर्प, हिंस्र पशू, उपोषण (अन्न न मिळाल्याने - गाईचे दूध व कंद नाही मिळाले तर) एका लंगोटीवर सहन करून गुहेत इतर ६-७ वडिलधार्या साधूंबरोबर ध्यान करणे.
१०) येहळेगावात आल्यावर व तुकामाईंना संपूर्ण शरण गेल्यावर अंगावर आलेले परीक्षेचे प्रसंग - सलग २-३ दिवस उपोषण, ९ महिने निद्रेविना, यथेच्छ निंदा ऐकणं, मारहाण सहन करणं, झिडकारून घेणं, डोक्यावर भारा घेऊन सद्गुरुंच्या मागे धावत सुटणं, डोहात २-३ तास पाण्यात बुडी मारून बसणं, बालहत्येचा खोटा आरोप घेऊन आलेल्या पालकांकडून जीवघेणी मारहाण मुकाट्याने सहन करणं
११) इंदूरमध्ये आल्यावर समाधि अवस्थेत देहभान जाणं.
१२) जिजींनी तिखटाचे गोळे, जळते निखारे खायला आणुन देणं.
१३) नाशिकला एका मंदिरात उतरल्यावर पत्नीशी अतिप्रसंग एक फौजदार करु लागल्यावर ते दृश्य शांतपणे, संयमाने व रामावर पूर्ण भार टाकून पहाणं.
१४) मुलगा, प्रथम पत्नी, वडिल, धाकटा भाऊ, धाकटी विवाहित बहिण यांचा लागोपाठ मृत्यू सहन करणं.
१५) प्रदीर्घ तीर्थाटनात अलिबागला सरदार बिवलकरांची बायको दर्शनाला येणार हे कळल्यावर विहिरीत बुडी मारुन २ तास पाण्यात बसणं.

१६) अबूच्या जंगलात भिल्लांकडून अवहेलना सहन करणं.

१७) महेश्वरला २ मांत्रिकांकडून ३ दिवस बसलेले कडक सर्पबंधन सहन करणं.
१८) दयेपोटी इंदूरच्या राजानं २-३ गावांची इनाम सनद अर्पण केल्यावर ती वाचून त्याच्याचसमोर ती टर्रकन फाडून टाकणं.
१९) नुसत्या लंगोटीनिशी वयाच्या ४५ शी पर्यंत पायी ३ वेळा संपूर्ण भारतभर प्रवास करणं.
२०) हल्याळ येथील एका घरातील एक बाई भिक्षा घालायला आल्यावर दुःखी दिसली म्हणून चौकशी केल्यावर तिच्या मुलाचा मुदतीचा ताप ११ दिवस उपाशी राहून त्या मुलाच्या वाटचा भोग भोगणं (त्याला जीवदान मिळाले, आईला आनंद मिळाला).
२१) खिशात पैसे नसताना मंदिर बांधायला काढणं, गावजेवणे घालणं.
२२) गांजेकस, चोर, लफंगे, बाहेरख्याली, व्यसनी, तिरसट, निंदक अशा माणसांना सांभाळणे, त्यांना जेऊ घालणे, त्यांना रामनामाला लावणे.
२३) इतरांच्या मुली दत्तक घेणे, त्यांच्या मुलींची स्वखर्चाने लग्ने लावणे. (जेणेकरून त्यांचा मृत्यू रामनाम घेत येईल व त्यांचे जन्माचे कल्याण होईल).
२४) इतरांच्या नको असलेल्या गायी दत्तक घेणे, त्यांना आजन्म सांभाळणे.
२५) विप्रांनी मोठ्या सभा भरवून रामनामाविरुध्द बंड करणे.
२६) अतिशय प्रेमळ अशा आईचा वियोग सोसणे.
२७) प्रसादाचा मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक होत असताना आलेल्या विचित्र अडचणी सोडवणे.
२८) स्त्रिया व लहान मुले यांच्या बरोबर प्रेमाने संभाषण करण्याने अनेक संन्याशांकडून धिक्कारलं जाणं.
२९) दोन मोठ्या दुष्काळात हजारो लोकांना किमान १ वेळचे जेवण रोज देणं.
३०) दुसर्या पत्नीला झालेली तीनही मुले कालवश होणं.
३१) प्रयागला ४०-५० जण बसलेली नाव गंगेच्या धारेत बुडत असताना सर्वांना धीर देऊन रामनामाच्या जयघोष करीत, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत, रामावर भार टाकून शांत व स्वस्थ रहाणं.
३२) भवानरावाला तो लांबवर काशीला असताना भुतापासून वाचवणं.
३३) औंधच्या राजघराण्याकडून होत असलेले विषप्रयोग ६५ व्या वर्षी एकट्याने समजून उमजून सहन करणं.
३४) ६५ ते ६८ या कालावधीत ३ वर्षे दम्याचा आजार सहन करणं.
३५) १० कोटी मागणार्या गांजेकसाचे हृदयपरिवर्तन करणं.
३६) १९०९ (वयाच्या ६४ व्या वर्षी) प्लेग मुकाट्याने सोसणं.
--------------------------------------------------------------------
हे सर्व समजून घेऊन मला काय वाटलं?
• संतपण खरच फार अवघड आहे हे निश्चित!
• सामान्य माणसांपुढच्या कसोट्या आणि संतापुढचे प्रसंग यात मुलभूत फरक असा की सामान्य माणसं जे वाटेल ते करतात, त्याचे परिणाम पुढचे पुढे बघू असा विचार ते करतात. संतांना संसार हा असार आहे हे माहीत असल्याने व भगवंताची लीला म्हणून ते अनुभवत असल्याने व विदेही अवस्था असल्याने त्यांच्या सामान्य वर्तनाचा अर्थ लावणे माणसांच्या बुध्दीपलिकडचे असते.
॥श्रीराम समर्थ॥