महाराजांनी केलेली वैदिक कर्मे

महाराजांनी केलेली वैदिक कर्मे
---------------------
स्वतः महाराज मुंजीनंतर आपल्या कुलोपाध्यायांकडून आवश्यक ती ब्रह्मकर्मे शिकले होते.
याशिवाय त्यांनी गोंदवल्याला व अन्य क्षेत्रांच्या ठिकाणी अनेक वैदिक कर्मे उत्तम शिकलेल्या व नावाजलेल्या विप्रांकडून करवली.

----------------
- रोज सर्व मंदिरांमध्ये पुजारी सोवळ्यामध्ये पूजा करीत असत. (अजूनही करतात)
- दर गुरुवारी व शनिवारी रुद्राभिषेक व पवमानाचा अभिषेक सर्व देवांवर होत असे.
- आपल्या पितरांची प्रतिवर्षीची सर्व श्राध्दकर्मे महाराजांनी गोंदवल्याला केली व तीर्थक्षेत्री जाऊन केली.
- विविध मंदिरांच्या स्थापने दिवशी भारतभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रांतील नामवंत विप्रांनी येऊन सांगोपांग राजोपचारात विधी केले.
- अन्नदान, गोप्रदाने होत असत.
- अनुष्ठाने झाल्यावर होमहवन होत असे.
- सर्व विप्रांना ते संतुष्ट होईपर्यंत भोजन, दक्षिणा, बहुमोल वस्त्रे, सुवर्ण दक्षिणा महाराज देत असत.
- ते स्वतः यजुर्वेदी असले तरी ऋग्वेदाला आद्य वेद म्हणून महत्व त्यांनी दिले होते.
- स्वतः ब्रह्मज्ञानी असूनही ते विप्रांना साष्टांग नमस्कार करीत असत.
- विप्रांना सभेमध्ये उच्चासन देऊन पुढे खाली महाराज बसत असत.
- महाराज श्रीरामाच्या मंदिरात त्याच्या जवळ जायचे असल्यास सोवळ्याची लंगोटी नेसून मगच मुर्तीला स्पर्श करीत असत.
- सर्व देवांना नैवेद्य दाखवल्यानंतरच सर्वांचे जेवण होत असे.
-----------------------------------------------------
महाराजांच्या या आदर्श वर्तनाचा माझ्यावर झालेला परिणाम -

- आमच्या देवघरात शाळीग्राम, दिवंगत सासरे महर्षी न्यायरत्न यांच्या कडील हरिद्वारला औंदुबरखाली सापडलेल्या लाल दगडी पादुका, परसात महादेवाचे देऊळ एवढे धन असूनही लग्न झाल्यास आमच्याकडून काही ब्रह्मकर्म झाले नव्हते. मला सांगायला सासूबाई नाहीत याचे मला नेहेमी वाईट वाटत असे. आपण एका महर्षींच्या व विदुषीच्या घरात राहतो आणि सगुणपूजा होत नाही याची मला शरम वाटत असे.
- रामनामाला लागल्यावर रामरायाचे पंचायतन आमच्या घरी आले.
- या रामरायाने आमच्या घराचा ताबा घेतला. त्यानेच आमच्याकडून विविध ब्रह्मकर्मे करवून घेतली...श्राध्दपक्षे, होमहवन, सर्व कुलधर्म-कुलाचार तो आमच्या कडून करवून घेतो.
- घरात कामाला असणार्‍या माणसांना मी सांगते की," हे घर रामरायाचे आहे, त्याचे सर्वांवर सतत लक्ष असते. रामनाम मुखी ठेवून कामे केली की वादावादी-भांडणे होणार नाहीत. हे ज्यांना मान्य असेल त्यांनीच येथे काम करावे. जे वागणे रामाला आवडेल तसेच वागावे."
- सुरुवातीला नावे ठेवली गेली, विरोध केला गेला, कसोटी पाहिली गेली, पण मी ठाम राहिले.
- परसातील देवळीत असलेल्या महादेवाला सांजवात करताना, प्रसंगी दीपआरास करताना मला, एका महान, विरागी, शांत, रामनामी रंगलेल्या, हिमधवल, पुराणपुरुष परमात्म्याला भेटल्याचा आनंद होतो.
- मला या देवांची सोबत वाटते.
- त्यांच्यासाठी आज काय करता येईल? असे विचार मला सत्कृत्याला प्रवृत्त करतात.

॥श्रीराम समर्थ॥