विद्वानांशी असलेले महाराजांचे वर्तन

विद्वानांशी असलेले महाराजांचे वर्तन
------------------
महाराज फारसे शिकले नाहीत (हेतूपुरस्सर कारण त्यांना ब्रह्मविद्या [भगवंत भेटण्याची विद्या] मिळवायची होती जिचे महत्व लौकिक विद्येपेक्षा [पैसा, मानसन्मान, उपाधि इ. मिळवून देणारी आणि अहंकार निर्माण करणारी] महाराजांना जास्त होते).

ते स्वतःला अडाणी/दीन म्हणवून घेत असत.

मात्र वेदपाठशाळेत वेद-उपनिषदे-षट्‌शास्त्रे इ. शिकलेल्या पंडितांना आणि इंग्रजी शाळेत शिकून सरकारी नोकरी करणार्‍या लोकांना ते सन्मानपूर्वक वागवीत असत.
त्यांना रावसाहेब म्हणत असत. त्यांच्याशी अदबीने बोलत असत. आणि स्वतःकडे कमीपणा घेत असत.

मुद्दाम फक्त संस्कृतमध्ये बोलणार्‍या विद्वानाशी संभाषण करायचे असेल तर ते संस्कृत बोलणार्‍या व्यक्तीला भाषांतरासाठी बोलावून घेत असत.

मात्र त्यांनी अंतर्ज्ञानाने येणार्‍या व्यक्तीची कधीच पारख केलेली असे.
कोण माणुस कशासाठी आलेला आहे, कोणत्या सुप्त हेतूने आलेला आहे, त्याच्या अंतर्यामी कशाची खळबळ आहे हे महाराज जाणत असत व ती खूण ते त्याला बोलताना देत असत.

केवळ पुस्तकी विद्येला महत्व देऊन थांबण्यापेक्षा आजच्या काळाला साजेसे नामस्मरण विप्रांनी करावे हे ते अतिशय प्रभावीपणे पटवून देत असत.

- सध्या धर्ममर्यादा राहिलेली नाही
- फक्त गायत्री वा वेदपठणाने भगवंत मिळण्यासारखी परिस्थिती नाही
- पूर्वी ऋषी-मुनी कंदमुले खाऊन दूरवर वनात कठोर तपाचरण करीत असत. ते संपत्ती मिळवणे, अन्नाचा संग्रह करणे इ करत नसत. कडकडीत वैराग्याचे आचरण त्यांचे असे. त्यामुळे त्यांच्या वेदोच्चाराला परिणामकारकता होती.
- आता वेदविक्रय होतो.
- विप्र धर्माचरण करीत नाहीत
- त्यांच्यातील काहींना व्यसने असतात.
- रोजची त्रिकाळ संध्या ते करीत नाहीत
- कोणतेही अन्न ते खातात
- वैदिक कर्मे व्यवसाय म्हणून केली जातात.

या सगळ्या कर्माचा दोष विप्रांना लागतो. या करीता जोडीला नामस्मरण करावे असे महाराज अगदी आर्जवाने आणि तळमळीने आणि नम्रपणे कधीकधी अतिशय तेजस्वीपणे सांगत असत.
----------------------------------------

हे वाचून मला काय वाटले?

त्यावेळी विद्वान याचा अर्थ वेदविद्या (४ वेद, १० उपनिषदे, वेदांची उपांगे) जाणणारा असा होता. हे विद्वान कर्ममार्गी होते. ते ब्रह्मज्ञानी नव्हते. पांडित्य त्यांच्याकडे होते पण शुध्दाचरण, चित्तशुध्दी होतीच असे नव्हते. त्यांना जात्याभिमान, विद्याभिमान होता. ते वादविवादनिपुण होते. त्यांच्या विद्येचा अहंकार त्यांच्या परमार्थाच्या आड येत होता. संतांना ते काडीइतकी किंमत देत नसत. कलियुगात नामस्मरणाला महत्व आहे हे जाणून सुध्दा भगवंताची भक्ती हे नामस्मरणाने करीत नसत.
अशा अभिमानी विद्वानांना समाजात महत्व होते. त्यांचे म्हणणे मानले जात असे. अशा विद्वानांना नामाचे महत्व पटवणे व त्यांच्याकडून नामस्मरण करून घेणे ही अत्यंत अवघड गोष्ट महाराजांनी केली. बाकीचा समाज नामाकडे वळवणं महाराजांना सोपं गेलं.
शुध्दाचरण व निर्मल चारित्र्य याला महाराजांनी खूप महत्व दिलेले आहे. तोंडाने पांडित्य आणि आचरणाने अशुध्द माणूस कधी परमार्थात प्रगती करू शकत नाही. नामाच्या सहाय्याने माणसाची चित्तशुध्दी होत जाते व त्याची हळुहळू परमार्थात प्रगती होत जाते. हे मी पक्के ध्यानात ठेवले आहे.
माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा वा सायकोथेरपीच्या व्यवसायाचा अनुभव आणि परमार्थातली प्रगती यांचा काही संबंध नाही. माझा फुकाचा अभिमान त्यामुळे कमी व्हायला या चिंतनाने मदत झाली.
परमात्म्याशी एकरूप होणं हे फक्त स्वतःला विसरल्यानंच शक्य होतं. सर्व प्रकारचे अभिमान त्याच्या आड येतात हे मी स्वतःला वारंवार बजावीत असते.

॥श्रीराम समर्थ॥