महाराज आणि राजकारणी

महाराज आणि राजकारणी
---------------------
१) येहळेगावला श्रीतुकामाईंच्या कृपेने आत्मसाक्षात्कार झाल्यावर ते आत्मज्ञान मुरण्यासाठी महाराजांना एकांतवास व तीर्थाटन करण्याचा आदेश मिळाला.
या ७ वर्षांच्या काळात

- नैमिषारण्यात त्यांची गाठ श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पडली. १८५८-५९ च्या बंडाचा बिमोड झाल्यावर पेशवे हिंदुस्थान सोडून प्रथम नेपाळला गेले तेथून ते नैमिषारण्यात शिरले. त्यांना अज्ञातवासात उरलेली वर्षे काढायची होती. महाराजांनी त्यांना अभय दिले. आपल्या गुहेपासून जवळच पण अंतर्भागातील एक मोठी गुहा त्यांना वस्तीला दिली. पेशवे आपले राज्य गेल्याने व कुटुंबापासून दूर एकटं राहावं लागत असल्यानं व पुन्हा राज्य परत मिळण्याची शक्यता संपल्यानं खूप उदास व दुःखी असत. तेव्हा महाराजांनी बदललेल्या राजकीय परिस्थितीची, काळानुसार आवश्यक नवीन प्रकारच्या नेतृत्वाची कल्पना त्यांना दिली. उर्वरित आयुष्य भगवंताच्या उपासनेत घालविण्याचा त्यांना सल्ला दिला. सुरुवातीला जरी पेशव्यांना ते पटले नाही तरी कालांतराने पटले.
महाराजांनी त्यांना आश्वस्त केले आणि मरणसमयी कल्याण करण्याचे वचन दिले.
पेशवे त्यानंतर शांत झाले. त्यांनी रामनामाच्या उपासनेबरोबर श्रीज्ञानेश्वरी, दासबोध आदि ग्रंतःआंचे वाचन व मनन केले. त्यांची परमार्थात चांगलीच प्रगति झाली. १८६० ते १९०६ या ४६ वर्षांच्या कालावधीत महाराज कैकवेळा नैमिषारण्यात जाऊन त्यांना भेटून आले. पेशव्यांच्या निधनसमयी महाराज त्यांच्याजवळ होते. महाराजांनी त्यांचे जन्माचे कल्याण केले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला व प्रयागला स्वतः त्यांच्या अस्थि विसर्जित केल्या.
- इंदूरमध्ये महाराज असताना तेथील राजा शिवाजीराव होळकर विशेष अडचणीत होता. तो महाराजांच्या दर्शनासाठी आला होता पण माहाराजांनी त्याला त्यावेळी दर्शन दिले नाही.
२) पुढे काही वर्षांनी महाराज तीर्थाटन करीत असता तुकोजीराव होळकर हे इंदूरचे अधिपति होते. त्यांना त्यांचे दिवाण राबसाहेब पळशीकर यांनी महाराजांचे दर्शन घेण्यास व सल्ला विचारण्याची विनंती केली. राजा साध्या वेशात येऊन परीक्षा घेऊ लागला तेव्हा आपण ओळखलय याची महाराजांनी त्याला खूण दिली. शिवाय सरकारचे जे सरकार म्हणजे परमात्मा याला विसरु नये, रामनाम घ्यावे असे सांगून त्यांना आशीर्वाद व अभय दिले.
कालांतराने राजाने दयेपोटी नजर केलेली सनद वाचून त्याच्यासमोरच महाराजांनी फाडली व राम मला पुरवायला समर्थ आहे असे सांगितले.
३) पुढे बर्‍याच वर्षांनी पुण्यात महाराजांची व लोकमान्य टिळकांची गाठ पडली. दोघांचा निकट परिचय झाला. दोघांचे बोलणे बहुधा एकांतात होत असे. लोकमान्य स्वतः महाराजांना भेटायला जात असत. लोकमान्यांमधले महाराजांना आवडलेले गुण - नीतीमत्ता, निस्वार्थी वृत्ती, भगवंतावर निष्ठा. लोकमान्यांनी त्यांना राजकारणात येण्याविषयी सुचवले असता महाराज म्हणले की तुम्ही तुमचे काम करावे, मी माझे काम करतो.
४) १८७६ सालच्या दुष्काळात महाराजांनी हजारो लोकांना मदत केल्याचे औंधच्या राजाने पाहिले होते. तो राजा व त्याची बायको त्यानंतर बर्‍याच वेळा गोंदवल्याला महाराजांच्या दर्शनाला येत असत. पुढे राज्याच्या मृत्यूनंतर राजघराण्यात मतभेद चालू झाले. जेकब या नावाच्या कलेक्टरला प्रशासक म्हणून इंग्रज सरकारने नेमले. जेकबने राजघराण्यातील दोन्ही पक्षांकडून पैसे खाण्यास सुरुवात केली. महाराजांना शरण आलेल्या पांगळ्या स्त्रीकडून पैसे मिळेनासे झाल्यावर जेकबने महाराजांवर अनेकप्रकारे प्रयत्न करुन विषप्रयोग केला.
त्यानंतर महाराजांना दमा सुरु झाला. महाराज त्यानंतर काल कसा येणार आहे, कशी युध्दे होणार आहेत, प्राणहानी होणार आहे, विषयांधता, नीतीशून्य वर्तन सर्वांचे होणार आहे याबद्दल सांगू लागले. रामनामाचा धोशा त्यांनी अजूनच प्रखर केला. किमान आपली माणसे तरी कलिकालाच्या कचाट्यातून सलामत राहावीत असे त्यांना वाटे.

हे वाचून मला काय वाटले?
- जोपर्यंत आपल्या सत्तेची मस्ती कोणी मिरवित आहे असे वाटे तोपर्यंत महाराज भीक घालीत नसत.
- मात्र कोणी मनापासून शरण आला व त्याने मानसिक परिवर्तनाची तयारी दाखवली तर महाराज काय वाटेल ते त्याच्यासाठी करीत असत. नानासाहेब पेशव्यांकरीता इतक्या वेळेला त्या काळात नैमिषारण्यापर्यंत खेपा घालायला केवढी मनाची उदारता हवी!
- जेकबने माझ्या सद्‌गुरूवर विषप्रयोग केला वे वाचून तर मी सुन्नच झाले होते. कितीतरी दिवस मला जेवण गोड लागत नव्हते. मन अतिशय अस्वस्थ होते. महाराज जाणूनबुजून विषप्राशनाला सामोरे गेले व विष घालणार्‍याला नाम देता आले नाही म्हणून हळहळले; ही त्यांची जगावेगळी रीत मला अजूनही कोड्यात टाकते. फक्त महादेवाला हे शक्य असते, आपल्यासारख्या माणसाचे ते काम नाही हे मनाला मी बजावते.

॥श्रीराम समर्थ॥