महाराजांचे स्त्रियांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध

महाराजांचे स्त्रियांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध
-----------------------------------------------------
१) जन्मानंतरचे पहिले काही महिने आईच्या कडेवर बसायला महाराजांना आवडायचं ते तिला दुसरं काही काम करु देत नसत. जर खाली सोडलं तर ते देवघरात जाऊन आसनावरून देव खाली काढत असत.
२) सुईणीच्या घरी जाऊन हक्काने दूधभात, दहीभात मागून घेऊन खायला त्यांना आवडायचं
३) आई वैतागली/कावली/रागावली की खुबीने बोलून ते तिची समजून काढीत असत व स्वतःविषयी विश्वास संपादन करीत असत.
४) गुरुशोधार्थ बाहेर पडल्यावर हरिपूर क्षेत्रातील साध्वी राधाबाई हिच्याकडे २ दिवस महाराज राहिले होते. तिने त्यांना मिरजेचे आण्णाबुवा या सत्पुरुषाकडे जाण्यास महाराजांना सांगितले.
५) येहेळगावला सद्‌गुरुकृपेने आत्मसाक्षात्कार झाल्यावर, काशीमध्ये असताना म्हातार्‍या बंगाली जमीनदार बाईच्या सूनेला मूल होण्यासाठी महाराजांनी आशीर्वाद दिले व रामनामाचा साडेतीन लाख जप करायला सांगितला. पुढे तिला नातू झाल्याचे कळल्यावर तिने महाराजांचा शोध घेऊन कलकत्याला आणले व त्यांच्या इच्छेनुसार तिने अभूतपूर्व असा हरिहाट ८ दिवस चालवला.
६) काशीला सती निघालेल्या एका स्त्रीच्या कोट्यधीश नवर्‍याला महाराजांनी जिवंत केले.
७) इंदूरला इनामदारांची बायको जिजी हिने साधूबैराग्यांवर विश्वास नसल्याने अघोरी पध्दतीने महाराजांची परीक्षा घेतली. त्यात महाराज सहीसलामत राहिल्यावर तिच्या लक्षात तिची चूक आली व ती त्यांना प्रचंड पश्चात्तापाने शरण गेली. महाराजांनी तिला उदार अंतःकरणाने क्षमा केली. जिजी देहात असेतोवर महाराज इंदूरला आले की त्यांची सेवा करत असे.
८) जिजीची ८-९ वर्षांची मुलगी ताई हिच्याशी महाराजांची गट्टी जमली होती. ते तिच्याशी खेळत असत. तिला त्यांनी योगाभ्यास, ध्यान इ. शिकवले होते. ताई आज्ञाधारक होती.
९) खातवळला सासूरवाडी बैराग्याच्या वेशात महाराज गेले होते. बेपत्ता झालेल्या जावयाचा/नवर्‍याचा शोध लागावा यासाठी त्यांच्या सासूबाई व पहिली पत्नी या नव्या साधूची मदत मिळावी यासाठी आल्या होत्या. महाराजांनी दोघींना दिलासा दिला व आपल्या पत्नीला अखंड नामस्मरण करायला सांगितले. पत्नीनेही त्याप्रमाणे केले. दोघींनी महाराजांना अर्थातच ओळखले नव्हते.
१०) डांबेवाडीला चुलतबहिण भीमाबाई हिच्याकडे महाराजांनी बैराग्याच्या वेशात भिक्षा मागितली. तिने ओळखले नाही म्हणून तिची थट्टाही केली.
११) कांचीला रहाणारी वरदराजाची उपासक अशी एक महासाध्वी होती. ती कायम साधनामग्न असे. बालपणीच एका सत्पुरुषाचे मार्गदर्शन तिला लाभले होते. तिला अखंड नामस्मरणाची युक्ती साधलेली होती. तिला दिव्यदृष्टी होती.
१२) तीर्थाटनानंतर श्रीतुकामाईच्या आदेशानुसार समाराधना करून महाराज गृहस्थाश्रमी झाले. आपल्या पत्नीला त्यांनी अतिशय प्रेमाने संसार कसा करायचा याचे उत्तम मार्गदर्शन दिले. भगवत्‌भजन, नामस्मरण व अन्नदान यावर त्यांनी तिला भर द्यायला सांगितला. पुढे कालांतरानं तिच्या आग्रहाखातर योगाभ्यास, श्वासाबरोबर नाम घेणे, ध्यान इ. तिच्याकडून करवून घेतले.
१३) पहिली पत्नी पहिल्या मुलाच्या निधनानंतर काही दिवसांतच निधन पावली. आईच्या आग्रहाखातर व त्या काळच्या प्रथेनुसार त्यांनी दुसरे लग्न करण्याचे मान्य केले. एका गावी जाऊन तेथील एका घरातील ५-६ मुलींपैकी जी जन्मांध होती तिच्यासाठी मागणी घालून, नंतर योग्य मुहुर्तावर तिच्याशी लग्न लावून ते तिला घरी घेऊन आले. तिला आजन्म बडदास्तीत ठेवली. तिला इच्छा झाल्यास ती महाराजांना पाहू शकत असे.
१४)अलिबागच्या सदुभाऊंच्या आईला अंतकाळ साधण्याचे वचन त्यांनी दिले
१५) जिजीची मुलगी ताई ही मोठी झाली. तिचे लग्न झाले. ती गर्भारशी राहिली पण तब्येत अतिशय अशक्त असल्याने बाळंतपण सोसणे तिला अवघड होते. महाराजांनी तिच्या वाटच्या बाळंतपणाच्या कळा सोसून तिची सुटका केली
१६)जिजीला त्यांनी आपले सद्‌गुरु श्री तुकामाई यांचे दर्शन करण्याकरीता नेले होते. (दोन अटी होत्या - त्यांच्यासमोर पाया पडायचे नाही, त्यांना महाराज म्हणायचे नाही)
१७) भारतदेशात साध्वी स्त्रिया किती आहेत हे पाहण्यासाठी महाराज एकदा मुद्दाम सर्व भरतखंड हिंडले होते. त्यांच्या पाहण्यात फक्त ३ स्त्रिया आल्या होत्या - १ मद्रासकडची, १ बंगालकडची, १ महाराष्ट्रातील. या तिघीही पूर्ण ब्रह्मज्ञानी होत्या. त्या सुगृहिणी होत्या, त्यांना मुलेबाळे वगैरे प्रपंचाचा सर्व पसारा होता.
१८) हल्ल्याळ गावातील एका आईचं दुःख बघवत नाही म्हणून तिच्या मुलाचा मुदतीचा ताप महाराजांनी ११ दिवस सोसला.
१९) थोरल्या राममंदिराच्या स्थापनेच्या दिवशी नवी वस्त्रे ल्यायलेली तेजस्वी आनंदमय मनोहर अशी महाराजांची मूर्ती पाहून त्यांच्या आईच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. तिने त्यांच्यावरून मीठमोहर्‍या ओवाळुन टाकल्या.
२०) सुवासिनी गोंदवल्याहून परत जाताना महाराज नेहमी खणानारळाने त्यांची ओटी भरत असत.
२१) शक्य तितक्या वेळी गावोगावी महाराजांनी सुवासिनी भोजने घातलेली आहेत.
२२) अनेक स्त्रियांना लागलेल्या पिशाचांशी तासन्‌तास व दिवसेंदिवस बोलून महाराजांनी त्यांना मुक्त केलेले आहे, व त्या स्त्रियांचे सांसारिक जीवन सुखी व्हायला मदत केलेली आहे.
२३) एका आईला दिलेल्या वचनाला जागून महाराजांनी तिच्या पश्चात‌ तिच्या परस्त्रीसेवन करणार्‍या मुलाला पदरात घेऊन त्याच्या गुन्ह्यांना क्षमा करुन त्यांनी त्याच्यामध्ये आंतरिक परिवर्तन घडवून आणले व तो मुलगा परमार्थाला लागला.
२४) महाराजांच्या एका दूरच्या नात्यातील म्हातार्‍या हलाखीत राहणार्‍या मावशीला तिच्या शेवटच्या दिवसात आपल्याजवळ महाराजांनी ठेवून घेतली व तिचा त्यांनी प्रेमाने सांभाळ केला. ती त्यांची रोज मानसपूजा करीत असे.
२५) दत्तक घेतलेल्या विठाबाईचे त्यांनी सालंकृत कन्यादान केले.
२६) आपल्या आईच्या म्हातारपणी तिची शेवटची इच्छा म्हणून तिची इतर १०० जणांबरोबर काशी-गया-प्रयाग-अयोध्या यात्रा घडवली. तिच्याकडून तिला आवडणारी मनसोक्त दाने करवली, रोज गंगास्नान करवले, विश्वेश्वराचे दर्शन करवले. अयोध्येला तिचे पूर्ण समाधान झालेले पाहून तिचं डोकं मांडीवर घेऊन ती परमधामाला जाण्याची व्यवस्था करवली. आई गेल्यानंतर अतिशय गहिवरल्या अंतःकरणाने त्यांनी रामरायाला आईला चरणांशी घेण्य़ाची विनंती केली. तिची अंतिम यात्रा काढली. तिचे सर्व दिवस केले, भरपूर दाने केली. काही वर्षांनी तिला सोबत म्हणून स्वेच्छेने राहण्यास तयार झालेल्या एका स्त्रीच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचेही क्रियाकर्म करविले.
२७) इंदूरच्या गोदूबाईला लहानपणी महाराजांनी योगाभ्यास शिकवला होता. तिच्याकडून त्यांनी एका उन्मत्त अबकारी अधिकार्‍यापुढे वाढून ठेवलेला कुलक्षय ऐकवला. पुढे ती मोठी व विवाहित झाल्यावर तिच्या मुलाच्या मुंजीत तुप संपले असता ते त्यांनी तिच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देऊन देहाने खूप दूर असून सुध्दा तूप पंगतीत जाऊन वाढले.
२८) महाराजांनी सांगितलेले जसेच्या तसे ऐकण्याची सवय असलेल्या पटाईत मावशींची ते गावातल्या इतर बायकांशी होणार्‍या भांडणात बाजू सुध्दा घेत असत.
२९) काशीयात्रेला घेऊन गेलेल्या कुटुंबातील लहान मुलींना ते गंगेत पोहायला शिकवीत
३०) महाराजांचे सारखे अन्नदान चालू असायचे. दुपारपासून रात्रीपर्यंत पंगती चालू चालायच्या. स्वयंपाकघरात काम करणार्‍या व बाहेर वाढणार्‍या बायकांना महाराज प्रेमाने जेवायला बसवायचे व स्वतः त्यांना आग्रहाने पक्वान्न वाढायचे.
३१) उर्मट, घमेंडखोर, श्रीमंत राण्या/सरदारणी यांना महाराज भीक घालत नसत.
३२) राजघराण्यातील एका अपंग स्त्रीचे पाप त्यांनी घेतले होते. काही दिवस त्यांचे अंग भाजल्यासारखे दिसत होते.
३३) एका गावच्या एका गरीब महारणीची त्य़ांनी अवघड बाळंतपणातून सुटका केली. तिला कळा देताना जप करायला सांगितला.
३४) स्वयंपाकघरात मुकाट्यानं राबणार्‍या स्त्रियांबाबत ते अतिशय मायाळू होते.
३५) कोणा एका श्रीमंताने दिलेले चांदीच्या रुपयांनी भरलेले ताट महाराजांनी दुसर्‍या एका ४ मुली लग्नाच्या असलेल्या गरीबाच्या ओटीत रिकामं केलं.
३६) दूरवर फिरत येऊन भीक मागून ते पैसे आपल्या म्हातार्‍या आईला पाठवणार्‍या राजस्थानी बाईची कहाणी ऐकून महाराजांच्या डोळ्यांत पाणीच आले व त्यांनी तिला भरपूर मदत केली
३७) कागवाडच्या गणूबुवांच्या मंदिराची झाडलोट करणार्‍या संताबाईचे त्यांनी मृत्यूसमयी कल्याण केले. तिने रामनाम घेत देह ठेवला. तिच्या उत्तरकार्याला महाराजांनी मोठी रक्कम दिली व तिच्या नावाने अन्नदान केले.
३८) ताप आल्यावर गरम सारभात करुन भरवणार्‍या जानकीबाईंना मृत्यूसमयी रामनाम घेत मोक्ष मिळवून देण्याची हमी महाराजांनी दिली.

हे सर्व अनेकवेळा वाचून समजून घेत असताना मला काय वाटले?

- स्त्रिया या परमार्थातली धोंड असतात, त्यांची उपेक्षा करावी असेच मी पूर्वी वाचले होते. मला खूप वाईट वाटले होते, रागही आला होता. मात्र मध्यमवयात परमार्थाविषयी वाचताना त्यातली मेख कळाल्यामुळे आधीचा राग गेला.
- गीतेमध्ये स्त्रिया, शुद्र, इ ना सुध्दा मोक्षाचा अधिकार आहे असे भगवंताने सांगितलेले मी वाचल्यावर मला खूप बरे वाटले होते.
- महाराजांची मातृभक्ती वाचून मला कितीतरी वेळा गहिवरून आलेले आहे विशेषतः अयोध्येला तिचे प्राण गेल्यावर महाराजांनी ज्या काकुळतेने रामरायाला तिला जन्म-मरणाच्या चक्रातून सोडविण्यासाठी विनवले आणि "मी आईविना पोरका झालो" असे म्हणले तेव्हा मी हमसून रडले होते.
- बाहेर पंक्ती घातल्यावर स्वयंपाकघरात दिवसभर रामनाम घेत राबणार्‍या महिलांना आग्रहाने जिलेबी वाढणारी त्यांची मूर्ती कितीतरी वेळा माझ्या मानसपटलावर आली आहे.
- संपूर्ण परमात्ममय झालेली त्यांची आंतरिक स्थिती आणि बाहेर त्यांचा आदर्श प्रपंच मला आदर्श ठरला आहे.
- स्त्रिया विशेषतः बहुतांशी आया या आपल्या लहान मुलांवर निस्वार्थी प्रेम करत असल्याने त्या परमात्म्याच्या त्यातल्यात्यात जवळ असतात; हे वाक्य मला फार आवडले होते. "आता तसे निस्वार्थीपण दिसत नाही हो", असे मला त्यांना सांगावेसे वाटले होते.
- महाराजच माझी आदर्श आई असल्याने मला खरे निस्वार्थी मातेचे प्रेम त्यांच्याकडून मिळते व माझी मातृप्रेमाची भूक भागते.

॥श्रीराम समर्थ॥