महाराज आणि लहान मुले
----------------
- महाराज लहान असताना सुध्दा आपल्यापेक्षा लहान मुलांना ते रामनाम घ्यायला सांगत.
- विशीच्या आत असताना, आत्मसाक्षात्कार झाल्यावर तीर्थाटन करीत असताना, जिथे ते मुक्काम करीत असत तिथे ते, तेथील लहाल मुलांना व मुलीना योगाभ्यास शिकवीत,
रामनाम घ्यायला सांगत, ध्यान करायला शिकवीत.
- महाराज या मुलांबरोबर खेळ खेळत असत. त्यांच्यात राहून ते त्यांच्यासारखे होऊन जात. मुलांना त्यांचा विलक्षण लळा लागे.
- मोठमोठ्या संन्याशांना/पंडितांना/अहंमन्य व्यक्तींच्या चिकित्सक प्रश्नांना उत्तरे ते स्वतः देत नसत तर जवळपासच्या आज्ञाधारी लहान मुलीच्या तोंडून ते उत्तर देववीत असत.
- दूध प्यावे, भरपूर व्यायाम करावा आणि रामनाम घ्यावे असे ते लहान मुलांना सांगत असत.
- मोठ्या माणसांशी (घरातल्या वडीलधार्यांशी) खुबीने वागावे, त्यांच्या सांगण्यामागचा कल्याणाचा हेतू जाणावा व त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागावे असे ते लहान मुलांना सांगत असत.
- लहान मुले त्यांना पालखी करुन आणताना ते एकदम पिसासारखे हलके होत असत.
- आजारी लहान मुलांसाठी त्यांचा जीव कळवळे.
- यात्रेला नेल्यावर महाराज मुलामुलींना गंगेत आपल्या पाठीवर बसवून फिरवून आणत, त्यांना पोहायला शिकवीत.
- महाराजांच्या कृपेमुळे कित्येक लहान मुलांनी मृत्यूसमयी रामनाम घेत एखाद्या योग्याप्रमाणे देह सोडला आहे व उत्तम गती मिळवलेली आहे.
- आपल्या घरी महाराजांनी यावे असे जर एखाद्या आईला वाटत असेल तर ती आपल्या लहान मुलीला/मुलाला बोलावणे करायला महाराजांकडे पाठवीत असे. व महाराज तिच्या/त्याच्या विनंतीला मान देऊन जात असत.
हे वाचून मला काय वाटले?
सर्व सिध्दी पायाशी लोळत असलेला हा महापुरुष दुसर्याचं भलं व्हावं या उद्देशाने किती विनम्रपणे वागत होता.
आपणही एक लहान मूल व्हावं आणि त्यांच्या बरोबर काशीयात्रा करावी, त्यांच्या पाठीवर बसून गंगेत पोहून यावं असंही मला वाटून गेलं.
एकदा वाटलं की त्यांच्या बरोबर जाऊन इतर भक्तांप्रमाणे वेणीदान आणि पितरांची श्राध्द मी केली असती. पंगतीत बसून जिलेबी खाल्ली असती. महाराजांचा थाट आणि पारमार्थिक ऐश्वर्य पाहिलं असतं. त्यांच्या सहवासात यात्रा करणार्यांमध्ये मी असते तर? महाराजांचा नुसता सहवास मला कितीतरी शहाणं करून गेला असता.
त्यांच्याकडून लहानपणी कसं वागावं याचे धडे मिळालेली मुलं खरच भाग्यवान!
॥श्रीराम समर्थ॥