आसूरी संपदायुक्त व्यक्तिमत्व

आसूरी संपदायुक्त व्यक्तिमत्व:
---------------------------
मी एक साधनी -
आसुरी संपदा घेऊन आलेल्या अज्ञानी माणसांचे व्यक्तिमत्व कसे असते?
माझ्या मनातील सद्‌गुरु -
ते दांभिक , दर्पयुक्त , अभिमानी , क्रोधयुक्त , कठोर (पारुष्यम), अज्ञानी असतात.
त्यांच्या मध्ये सत्याचा अभाव असतो.
त्यांची जगाची कल्पना अशी असते की जग हे ईश्वराशिवाय चालते, ते स्त्री-पुरुष संयोगातून निर्माण झालेले आहे.
त्यांच्या जगण्यामागचा हेतू कामच असतो.
ते अल्पबुध्दी ,
अहित करणारे असतात.
ते उग्रकर्मी, जगाच्या नाशाचा हेतू बाळगणारे, तसा विचार करणारे व कृती करणारे असतात.
हे आसूरी प्रवृत्तीचे लोक अविवेकी, अतिरेकी,
प्रत्यक्षात येऊ न शकणार्‍या कामनांचा आश्रय घेणारे,
मिथ्या सिध्दांतांचे ग्रहण करणारे,
अशुचिव्रत अंगिकारलेले असतात (भ्रष्टपणा व अपावित्र्य हीच त्यांची जीवनपध्दती असते).
दंभ, मान, मद यांनी भरपूर,
प्रलयापर्यंतच्या चिंतांचा आश्रय केलेले,
कामभोगात तत्पर असलेले व त्यातच सर्व सुख समजणारे,
शेकडो आशांच्या पाशात गुंतलेले,
काम व क्रोध यांच्या आहारी गेलेले,
विषयभोगासाठी अन्यायपूर्वक धनसंग्रह करणारे ते, दुसर्‍याची निंदा करणारे असतात.
परमेश्वराचा द्वेष करणारे असे ते असतात.
दीन असे ते फळाचा हेतू ठेवून असतात.
मला यज्ञ करायचाय, मला दान द्यायचय, मला मजा करायचीय. अशी बडबड ते करतात.
वेदांत सांगितलेल्या फळाची ते प्रशंसा करतात. त्यांना स्वर्गाची आवड असते.
त्यांची विषयांची आवड सतत राहते.
दुसर्‍याची हिंसा करताना ते, मी आत्म्याला मारतो असं समजतात.
मरताना किंवा मेल्यावर माझा आत्मा मेला असं समजतात.
स्वर्गापेक्षा अधिक प्रिय दुसरं काही नाही असं ते समजतात.
मी कर्ता आहे असं ते मानतात.
आज मी हे मिळवले, उद्या मी ते मिळवेन, आज माझ्यापाशी एवढे धन आहे, नंतर मला ते पुन्हा मिळेल, त्याला मी मारलंय, इतरांना मी मारणार आहे , मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, मी सगळं मिळवून बसलो आहे, मी बलवान आहे, मी सुखी आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठ्या कुटुंबाचा पोशिंदा आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? अशी वल्गना ते करतात.
आत्म्याविषयी ऐकूनही ते आत्म्याविषयी जाणू शकत नाही्त.
ते अविचारी असतात.
त्यांची बुध्दी बहुशाखा असलेली असते.
ते अविवेकी असतात.
भोगाऐश्वर्यांविषयी वर्णन करताना विशेष क्रिया सांगणारी दुसर्‍याच वाणी त्यांचे मन हरण करते.
परमात्म्याविषयी त्यांची बुध्दी स्थिर नसते.
-------------------------------------------
मी एक साधनी -
या अज्ञानी भक्तांचे कर्म कसे असते?
माझ्या मनातील सद्‌गुरु -
त्यांची सर्व कर्मे सकाम असतात.
ते भोगात तन्मय झालेले असतात.
दिखाऊ शोभा असलेली वाणी ते उच्चारतात.
इंद्रिये आवरल्यासारखी दाखवीत, मनाने इंद्रियांच्या विषयांचे ते स्मरण करीत असतात (मिथ्याचार).
देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता ते स्वतःच भोगतात (स्तेन).
ते स्वतःच्या कारणासाठी अन्न शिजवतात व खातात.
इंद्रियभोगात रमत व्यर्थ आयुष्य ते जगतात.
नाशीवंत सांसारिक विषयांच्या सेवनामध्ये ते पूर्ण जागे असतात.
परमात्म्याच्या भक्तीमध्ये ते झोपलेले असतात.
भगवंतावर ते दोषारोप करतात (अभ्यसूयन्तः).
त्याच्या मताला अनुसरुन आचरण करीत नाहीत(अश्रध्द).
अज्ञानी भक्त आपापल्या स्वभावाप्रमाणे प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात.

(संदर्भ: अध्याय १६ - दैवासुरसंपद्विभागयोग, श्लोक - ४, ७ ते १८)