पंचांग

पंचांग

तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या कालगणना करणार्‍या पाच अंगांची रोजची माहिती ज्यात असते, त्याला ‘पंचांग’ म्हणतात. चैत्र ते फाल्गुन अशा बारा महिन्यांचे पंचांग यात दिलेले असते.

तिथी - प्रतिपदेपासून शुक्ल पक्षातील पौर्णिमा व वद्य पक्षातील अमावास्या अशा एकूण पंधरा तिथी असतात. आपले सर्व धार्मिक सण, व्रतवैकल्ये तिथींवर अवलंबून असतात. म्हणून तिथीला पंचांगात प्रथम स्थान दिलेले आहे. कृष्ण त्रयोदशी, कृष्ण चतुर्दशी, अमावास्या आणि शुद्ध प्रतिपदा या तिथी शुभकार्यास वर्ज्य सांगितल्या आहेत.

वार - एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत एक वार असतो. रविवार ते शनिवारपर्यंत सात वार असतात. सोमवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे सर्वसामान्यपणे शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात. रविवार, मंगळवार व शनिवार हे क्रूरकर्मांसाठी वापरतात.

नक्षत्र - अश्विनीपासून रेवतीपर्यंत सत्तावीस नक्षत्रे असतात. प्रत्येक नक्षत्रासंबंधी नाडी, योनी, गण, आराध्यवृक्ष, दान, देवता, मुख, दृष्टी, तत्त्व, संज्ञा, राशी, स्वामी, स्वामी, वर्ण, वश्य, तत्त्व या अंतर्गत विविध प्रकारची फले दिलेली असतात.

योग - योग सत्तावीस असतात. योग म्हणजे सूर्य व चंद्र यांच्या गतीवरून काढलेले वर्तुळाचे सत्तावीस भाग. या सत्तावीस योगांची शुभ आणि अशुभ फले निश्चित केलेली असतात.

करण - करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. करण हे पंचांगाचे पाचवे अंग होय.

या पाच अंगांपैकी आकाशात प्रत्यक्ष दिसतात ती फक्त नक्षत्रे. बाकीची चार अंगे प्रत्यक्षात दिसत नसली तरीही हजारो वर्षांपासून त्या अंगांची शुभ-अशुभ फले मिळतात, असा अनुभव आहे.

दिनमान - दिनमान म्हणाजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळातील एकूण तास व मिनिटे. या काळाचे पाच समान भाग होतात - (१) प्रात: (पहाट), (२) संगव (सकाळ), (३) मध्याह्न (भरदुपार), (४) अपराह्न (कलती दुपार), (५) सायाह्न (सायंकाळ).

शक - पंचांगात एकूण आठ शके दिलेली असतात. कालयुग शक (युगाब्द), महावीर संवत्‌, विक्रम संवत्‌, ईसवीसन, शालिवाहन शक, हिजरी सन, पारसी सन, शिवशक.

संवत्सर - संवत्सर म्हणाजे एक वर्ष. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एक संवत्सर, अशी साठ संवत्सरे असतात. साठ संवत्सरांचे एक चक्र असते. प्रत्येक संवत्सराचे विशिष्ठ नाव असते. काही संवत्सरे शुभ फल देणारी तर काही अशुभ फले देणारी असतात.

याशिवाय पंचांगामध्ये इतरही विविध प्रकारची उपयुक्त माहिती दिलेली असते. वधुवरांचे कुंडलीमेलन, उपनयन (मुंज) मुहूर्त, विवाहमुहूर्त, गुरुपालट, शनिपालट, वास्तुमुहूर्त, भूमीपूजन व पायाभरणी मुहूर्त, मूर्तीप्रतिष्ठापना मुहूर्त तसेच सूर्यग्रहण व चंद्रग्रहणांविषयी माहिती दिलेली असते. याचबरोबर चैत्रापासून फाल्गुनापर्यंत येणार्‍या सण व व्रतांचीही माहिती यात असते. संकष्टी चतुर्थीचे चंद्रोदय गावांनुसार दिलेले असतात. विविध ग्रहांचे योग, ग्रहांची दाने, ग्रहबले, व्यासरचित मंत्र, कुलधर्म, कुलाचार, श्राद्ध, आडनावांप्रमाणे गोत्र-प्रवर, अशौच (अशुद्धी असल्यामुळे स्पर्श टाळणे), सोयर व सुतक यांविषयीही माहिती पंचांगात दिलेली असते.

॥श्रीराम समर्थ॥