भक्तीमार्गी होण्यापूर्वीचे आत्मचिंतन:
सायकोथेरपीच्या माझ्या स्वत:च्या प्रवासात शेवटी शेवटी मला जे उमगलं ते असं की, मी जगावर कावले होते, नशिबावर वैतागले होते, बाहेरची परिस्थिती आपण बदलू शकत नाही म्हणून हतबल झाले होते,
मनासारखं घडत नाही म्हणून सुन्न झाले होते, सगळं असूनही एक फ़ोलपण अनुभवत होते, विचार करकरून डोक्याचं भुस्कट पाडून घेत होते. या माझ्या परिस्थितीला मीच जबाबदार होते, हे सत्य स्वीकारणं मला खूप जड गेलं होतं.
आत्मप्रतिमा
त्यावेळेला असलेल्या संकटांचं मूळ माझ्या बालपणच्या वेळी मी जी माझ्याविषयीची एक तात्पुरती प्रतिमा, माझ्या नकळत बनवली होती, तिच्यात मला सापडलं. सर्वसामान्य माणसाप्रमा्णेच जगाविषयीच्या आणि माझ्याविषयीच्या, जग कसे असावे आणि मला काय मिळावे, याविषयीच्या काही आदर्श कल्पना होत्या. या आदर्श कल्पना प्रत्यक्षामध्ये येतील अशी आशा उराशी बाळगून मी आटोकाट प्रयत्न करत होते. या प्रयत्नाला यश यायलाच पाहिजे असा माझा एक भाबडा समज होता.
मध्यमवयात आल्यानंतर काय गमावलं, काय मिळवलं याची बेरीज–वजाबाकी करताना प्रयत्नाने मिळवलेलं आणि विनासायास मिळालेलं यश मी गृहित धरलं. अपयश मला सहनच होत नव्हतं. यशाच्या वाटेवर असणारी संकटं, अडचणी मी स्वीकारल्या होत्या. पण इतकं मिळूनही काहीतरी महत्त्वाचं गमावलं ही बोच मला अस्वस्थ करत होती.
अपेक्षा
या माझ्या अपेक्षा, स्वप्नं यांचा मागोवा घेताना माझ्या असं लक्षात आलं की, मी अगदी खोल खोल मनाच्या गर्भगृहात जाऊन पोचलीय. ह्या सगळ्या माझ्या अपेक्षा, इच्छा प्रत्यक्षात माझ्या स्वत:च्या नसून आईवडील, वडीलधारे यांच्या आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांच्या अभिनंदनास पात्र व्हावं ह्यासाठी जीवघेणी धडपड मी करत होते.
त्यातल्या काही अपेक्षा पूर्ण झाल्या, काही नाही झाल्या. त्या पुर्या न व्हायला कोणती कारणं घडली? याचा मी शोध घेतल्यावर मला असं कळलं की, एक माणूस म्हणून असलेल्या माझ्या मर्यादा, माझ्याकडे असलेल्या साधनसंपत्तीच्या मर्यादा आणि काही तरी माझ्यापलिकडे असलेल्या शक्तींचं नियंत्रण ही ती तीन कारणं होती.
महत्वाकांक्षा
माझ्याकडे अमर्याद शक्ती आणि साधनं असावीत जेणेकरून परिस्थिती कायम माझ्या नियंत्रणामध्ये राहील ही माझी अवास्तववादी महत्त्वाकांक्षा, माझ्यामधील सततच्या अस्वस्थतेमागील भूत होतं.
वास्तववादी शास्त्राचा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की - आपण सर्व मर्त्य आहोत,
आपल्या शक्तीला आणि साधनसंपत्तीला मर्यादा आहेत,
आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडेल याची खात्री नाही,
आपल्याला न्याय मिळेलच असं छातीठोकपणे सांगता येणार नाही.
तरीही आपल्या इच्छेप्रमाणे सुख मिळावं असं स्वप्नरंजन आपण सर्वजण करीत असतो.
आपली आशा अतिशय चिवट असते
आणि तीच विविध इच्छांना जन्म देते आणि
त्यांचा अथकपणे पाठपुरावा करण्यासाठी आपल्यामागे हात धुऊन लागते.
मर्यादा
मला नंतर असंही समजलं की - मला जर माणूस म्हणून मर्यादा आहेत तर माझ्या मनामध्ये विविध स्वप्नांचं, आकांक्षांचं बीज टाकणार्या माझ्या आईवडील व सर्व वडीलधार्यांनाही माणूस म्हणून मर्यादा असणारच, तीही मर्त्य आहेत, त्यांच्यापैकी कोणीच सर्वगुणसंपन्न आणि आदर्श नाही, त्यांची स्वत:ची फ़ारच कमी स्वप्नं प्रत्यक्षात आलेली आहेत. पूर्ण समाधानी असं कोणीच मला दिसत नाही. त्याचं कारण असं असेल का, की त्यांच्याही मनात त्यांच्या आईवडीलांच्या वेगवेगळ्या स्वप्नांचं ओझं आहे? आणि त्यांनाही त्यांच्या मर्यादा आणि कमतरता यांचं भान नाही.
असं जर असेल तर इथून तिथून सर्व माणसं सारखीच – काळी-गोरी-निमगोरी-पिवळी, जाड–बारीक–उंच-बुटकी, कुरूप-सुस्वरूप, अपंग-धडधाकट, रोगी-निरोगी, श्रीमंत-गरीब, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहात असली तरी जन्म-मृत्यू, व्याधी-संकट, सुख-दु:ख, आशा- निराशा हे कुणालाच चुकलेलं नाही.
दुःखाचे बीज
माझे आईवडील सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असावेत, त्यांच्या माझ्याविषयीच्या आदर्श महत्त्वाकांक्षा पूर्ण करून मीही आदर्श व्हावं आणि सदैव त्यांच्या कौतुकास पात्र व्हावं हे प्रत्येक मानवी मनाच्या गाभार्यात असलेल्या दु:खाचं बीज आहे, असं मला समजलं. हा प्राथमिक त्रिकोण माझ्याशी संबंधित असलेल्या जगातील इतर सर्व व्यक्तींना लागू होतो.
बॅटन घेऊन रेस
वयाने, अधिकाराने, पैशाने, गुणवत्तेने, सत्तेने, शक्तीने मझ्यापेक्षा वरचढ असलेल्या माणसाकडे मी माझ्या "नकळत" माझ्या आईवडिलांचं स्थान देत होते आणि त्या व्यक्तीच्या कौतुकाला पात्र व्हावं यासाठी जिवाची बाजी लावत होते. जेव्हा मी वयाने, अधिकाराने, सत्तेने, बुद्धीने, शक्तीने इतरांपेक्षा वरचढ होते तेव्हा माझ्या नकळत मी माझ्या मनातल्या आदर्श आईवडिलांची भूमिका घेत होते आणि इतरांकडे माझी आदर्श मुलं म्हणून अपेक्षेने पाहात होते. आपल्या महत्त्वाकांक्षा त्यांनी पुर्या कराव्यात असा हट्ट धरत होते.
आदर्शाचा बुडबुडा
हे सगळंच ‘आदर्श’ ह्या एका भासाच्या बुडबुड्यासारखं होतं. महत्त्वाकांक्षेच्या बुडबुड्यांना जन्म द्यायचा, त्यांना फ़ुगवत जायचं, ते हवेत तरंगायला लागले की आपणही तरंगायचं, ते फ़ुटले की आपणही फ़ुटून खाली आदळायचं. असं रोज घडत असूनसुद्धा, स्वप्नांच्या नवनवीन बुडबुड्यांना जन्म देणं मी काही थांबवत नव्हते.
इच्छांचा प्रसव
राणीमुंगी किंवा राणीमाशी, बिळामध्ये खोलवर, अंधारात सतत अंड्यांना प्रसवत राहाते, तसं माझ्या मनाच्या खोल गाभार्यात विविध इच्छा आणि महत्त्वाकांक्षा प्रसवणारं काहीतरी असलं पाहिजे, असं माझ्या लक्षात आलं. दिसताना सर्व अंडी जशी सारखीच दिसतात तशा सगळ्या इच्छा सुरुवातीला निरुपद्रवीच वाटतात. पूर्ण वाढ होऊन पिल्लं जेव्हा अंड्यातून बाहेर येतात आणि स्वतंत्रपणे हालचाल करू लागतात तेव्हा त्यांच्या रंगरूपातील आणि गुणवत्तेतील वैविध्य स्पष्ट व्हायला लागतं. जशी इच्छापूर्तीसाठी बुद्धी विचार करायला लागते तशी त्या इच्छांमधली विविधताही आपल्या लक्षात यायला लागते. सर्व पिल्लांचं भवितव्य जसं एकसारखं असत नाही, प्रत्येक पिल्लू आपलं एक नशीब घेऊन जन्माला येतं, जसं प्रत्येक माणसाचं नशीब वेगळं असतं तसंच त्याच्या मनामध्ये जन्म घेणार्या प्रत्येक इच्छेलाही एक नशीब असावं का काय? - असा विचार उमटून जातो.
माझे नियंत्रण, माझी पराधीनता
ह्याचा अर्थ असा की इच्छांचा जन्म आपल्या नियंत्रणाखाली नाही, इच्छांचं स्वरूप आणि गुणधर्म आपल्या हातात नाही, इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी करावे लागणारे प्रयत्न एका मर्यादेपर्यंत आपल्या हातात असतात, इच्छांचं पूर्ण होणं आपल्या हातात नसतं. म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या मर्यादित गुणवत्तेप्रमाणे माझे मर्यादित प्रयत्न एवढंच माझ्या हाती असावं की काय? बाकी काहीच माझ्या नियंत्रणाखाली नाही!
नियंता
माझा जन्म, माझा विकास, माझा मृत्यू, मृत्यूनंतरची माझी गती, माझ्या मनोविश्वात स्थान असलेल्या सर्व माणसांची जन्ममृत्यूगती, निसर्गातल्या सर्व सजीवांचं जन्ममृत्यूचक्र, सजीव आणि निर्जीव ह्यांच्यामधील साखळी, पृथ्वीबाहेरचं अफ़ाट, असीम विश्व – ह्यांना नियंत्रित करणारं काहीतरी असलंच पाहिजे राव!
कशासाठी ही निर्मिती?
जे काही हे सगळं नियंत्रित करतंय त्यानं हा उपद्व्याप मांडला कशाला? ह्या सगळ्या घडामोडींच्यामागचा त्याचा हेतू काय असावा? तो दिसत नाही पण तो असला पाहिजे, तो असला तर मला जाणवायला पाहिजे. कधीतरी जाणवून तो जो गुप्त होतो, त्याला पकडायचा कसा? प्रत्येक कणाची हालचाल जर त्याच्या इच्छेने होतेय तर त्याचं अस्तित्त्व मला सतत का जाणवू नये? ह्या चिंतनापोटी मी परमार्थाकडे शिरले.
॥श्रीराम समर्थ॥