९ सप्टेंबर -
भगवंताचा विसर हेच मोठे पाप.
----------------------------------------------------
आप्त -
जन्ममरणापासुन जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त.(म्हणजे आपले सदगुरुच आपला आप्त) ह्या अर्थाने सर्व संत जे स्वतः मुक्त झाले आणि इतरांना मुक्तिचा मार्ग दाखविला ते आपले आप्त.
आप्त वाक्य -
सर्व विषयवासना सोडून भगवंताला शरण जावे हे भगवंताला आवडते.
जे भगवंताला जाणतात ते भगवंताचे मर्म ओळ्खतात त्यांना जगाची भीती वाटत नाही.
आपल्याला सगळे जमते पण भगवंताला शरण जाणे जमत नाही.
माणसाला जास्तीच्या बुध्दीची देणगी भगवंत जाणण्यासाठी मिळाली आहे.
भगवंत जाणण्याची सुरुवात आणि शेवट नामस्मरणानेच होते.
आपण नामस्मरण करु लागलो की विषय हात धुऊन मागे लागतात.(प्रपंचातल्या हव्या नको वाटण्यार्या सर्व गोष्टी) त्यामुळे आपण नाम घेऊ लागलो की आपण आत बाहेर विषयाने किती भरलेलो आहोत हे समजते. कितीहि वाईट विचार आले तरी दृढ निश्चयाने आपण नाम घेणे चालू ठेवावे. चालू क्षण दवडू नये. निराश होऊ नये.
भगवंत जोडण्यासाठी कष्ट घ्यावेत. जसे आपण प्रपंच करण्याकरिता आपण मरेपर्यंत कष्ट करतो.
भगवंताचा विसर पडणे ह्याहुन मोठे पाप नाही.
देव हवा असे वाटणे ही देवाची बुध्दी.
विषय हवा असे वाटणे ही देहाची बुध्दी.
वासना म्हणजे देवाच्या विरुध्द असलेली आपली इच्छा
वासना जशी कमी होत जाईल तशी आपली बुध्दी नामात स्थिर होत जाईल.
नामस्मरणाच्या योगाने, "तू आहेस मी नाही", ही स्थिती आपली होईल तेव्हाच आपण भगवंत जोडला असे म्हणता येईल.
निदिध्यासाने आनंदसाक्षात्कार होणे हाच मोक्ष.
॥श्रीराम समर्थ॥