श्रध्देची श्रीमंती
---------------
संदर्भ - महाराज चरित्र पान ६४२-४३
(श्रीमहाराज प्रवचन - गुरुपौर्णिमा १९०५)
---------------
आपल्या गुरुने जे सांगितलं त्यावर श्रध्दा ठेवावी
गुरु आपल्याला नाम देतात आणि सांगतात की तुम्ही नाम घ्या म्हणजे तुम्हाला भगवंताचे दर्शन होईल.
श्रध्दा म्हणजे जे आपण पाहिलं नाही त्याच्यावर भरवंसा ठेवणं.
श्रध्दा ठेवण्यात एक धाडस असतं
श्रध्दा ही मनाची शक्ति आहे.
श्रध्दा ठेवणारा माणूस दुबळा नसतो.
श्रध्देच्या आधारे आपण नाम घेत राहावे.
नाम म्हणजे भगवंताची आठवण
ज्या दिवशी तुमची आठवण एका भगवंतापाशी गोळा होईल त्या दिवशी तुमच्या जीवाची सारी शक्ति एकत्र येईल.
शक्ति एकत्र येण्यात एक धुंदी असते. त्या धुंदीत देहाचा विसर पडतो.
तेथे आतील मंदिराची दारे उघडतात. मंदिरात हृदयात वीणा वाजू लागते. त्यातून निघणारे दिव्य संगीत म्हणजे अनाहत नाद ऐकू येतो.
गुरूंनी दिलेल्या नामावरील श्रध्देच्या द्वारा भगवंत आपल्या जीवनात प्रवेश करतो.
ज्या क्षणी आपल्याला फक्त भगवंताचे नाम आठवेल त्या क्षणी भगवंताचे दर्शन होईल.
भगवंताची आठवण अखंड होत राहिली - म्हणजेच त्याचे नाम अखंड चालले की तोच आपल्याला शोधत येतो.
भगवंताला इतर कोणताही गुण आवडत नाही. आपल्या अंगी फक्त त्याचे नाम सतत घेण्याचा गुण पाहिजे.
श्रध्दा भगवंताला आवाहन करते. पण ती प्रथम नामाचा हात धरते (नाम कोठे चालू आहे ते शोधते) व मगच त्याला (भक्ताला) शोधते.
सद्गुरूंनी सांगितले की नामात भगवंत आहे. मग तो असलाच पाहिजे असे निःसंशय वाटणे याला श्रध्दा म्हणतात.
नामावरील श्रध्दा ही मानवीजीवनातील सर्वात मौल्यवान वस्तु आहे. नामावरील श्रध्दा ही खरी श्रीमंती समजावी. त्या श्रीमंतीने माणसाच्या जगण्याला ऐश्वर्य प्राप्त होते.
सद्गुरु शिष्याला नाम देतात तेव्हा त्याला परमार्थाच्या दृष्टीने आपला म्हणतात. त्याला दत्तक घेतात.
शिष्याने गुरुने दिलेले नाम मनापासून जपले तर गुरुचे अतींद्रिय ऐश्वर्य त्याला विनासायास प्राप्त होते. दृश्य वस्तूंचे ऐश्वर्य मरणसमयी हरवते, पण गुरुने दिलेले अतींद्रिय ऐश्वर्य मरणानंतर बरोबर येते. त्या ऐश्वर्यामधे जीवाला भगवंताचा स्पर्श होतो. त्या दिव्यस्पर्शाचा चमत्कार असा आहे की कितीही नाम घेतले तरी जीवाची तृप्ती होत नाही.
म्हणून केवळ नाम घेण्यासाठी तो पुनः जन्म घेतो. नामाने काही मिळवायचे उरले नसून नामानंद भोगण्यासाठी जन्मास येणे यासारखे भाग्य फारच थोड्यांना लाभते.
॥श्रीराम समर्थ॥