महाराजांनी साधकांना दिलेली आश्वासने
------------------------
- भक्ताचे कर्तेपण मेले की त्याची मला काळजी लागते.
- मी तुमचा सांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, ही भावना ठेवून घ्या. वाटेतील अडचणी येऊन जातील, त्या कळणार सुध्दा नाहीत.
- नामाचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी (उद्योग/व्यवसाय) बाळगावी. उपाधीची हौस (खूप वेळ/शक्ती देणे) नसावी. उपाधीने शक्ती झिरपते (दमायला होतं).
"मी नाम घेतो" हा सुध्दा एक संकल्पच आहे. तो नाहीसा करावा ..नाम सुध्दा थांबून जावे. या संकल्परहित अवस्थेत (निर्विकल्प) सद्गुरुशी अनन्य होऊन आपण आपला आनंद भोगावा. त्या स्थितीत सद्गुरुच शिष्याचे नामस्मरण करतात, शिष्य स्वस्थ आरामात राहातो.
- नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय.
- जेथे नाम आहे तिथे मी आहे.
- "परमात्मा सर्व करतो" ही भावना ठेवावी
- नाम घेताना मला धरुन ठेवा. माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल. मग तुम्ही माझ्यासारखे व्हाल.
- जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळीन. त्याची अंगलट माझ्यासारखी होईल. त्याची कामे आपोआप होतील. डोळे उघडून जग नाहीसे होईल तर ते नामानेच होईल हा माझा अनुभव तुम्ही घ्या. मला लुटून न्या.
माझ्यापाशी आनंदाशिवाय दुसरे काही नाही.
- माझ्याकडून नाम आलेल्या साधकाला रंग आणि नाद असले दृश्यमय अनुभव क्वचित येतील. तो एकदम आनंदाला झोंबेल. पण त्याला वेळ लागेल.
चोवीस तास माझा सहवास होण्यास नामच एक उपाय आहे.
- माझ्या माणसाने उगीच काळजी करु नये. मी त्याची हमी घेतली आहे. त्याने माझ्यावर श्रध्दा ठेवावी व नाम घ्यावे.
- नाम सूक्ष्मावर (सूक्ष्म देह व कारण देह जिथे वासनांचे बीज असते) परिणाम करते. तो लवकर दिसत नाही.
- मी तुमचा भार घेतलेला आहे. तुमच्या जीवाची मूर्ती घडवण्याचे माझे काम सतत चालू आहे.
- मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, तुम्ही रामरूप व्हाल.
- तुमची देहबुध्दि क्षीण करणे हे माझे काम आहे. ते करताना जीवाला सूक्ष्म कष्ट होणारच. पण मी सांगाती आहे. त्या कष्टांची जाणीव कमी केल्याशिवाय मी राहणार नाही, मुळीच घाबरू नये.
- नामामध्ये प्राण ओतून ते घ्या म्हणजे पुढील अवस्था आपोआप येतील, त्या येण्याचे काम माझ्याकडे लागले.
- अखंड नामस्मरण आणि भगवंताचे अनुसंधान याशिवाय मला काहीही प्रिय नाही. नामाची ज्योत जळती ठेवा. तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन, नव्हे तुमचा मी ऋणी होईन.
- देहाचे भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही माझे म्हणवताना देहाचे भोग शांतपणे भोगण्यात मी आहे.
- रामाला साक्ष ठेवून सांगतो की माझ्याशी आपलेपणा ठेवा. मला आवडते म्हणून नाम घ्या. तुमच्या पापाचा भार मी घेतला अशी खात्री बाळगा. ते पाप पुनः करू नका, तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्याकडे लागली.
- मनातील हवे-नकोपण नाहीसे कराल तर मी तुमच्याशी बोलू लागेन. माझे बोलणे म्हणजे अशारीर वाणी. ती ऐकायला येण्यास हृदयात नाम स्थिरावणे जरुरीचे आहे.
- तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते.
- तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे-पुढे चालतो.
- भगवंताचा प्रपंच भगवंत बघून घेतो.
- नामस्मरण करताना तुम्ही मला पाहात नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे.
- तुमची देहबुध्दी कमी होईल तेव्हा मी तुम्हाला कसा आहे ते जाणवेल
- तुम्हाला नामाची अत्यंत आवड लागली की माझा आनंद उचंबळून येतो. मग तुमच्यासाठी काय करू अन् काय नको असे मला होऊन जाते.
- माझ्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही वागलात तर काळालादेखील दूर साराल.
- माझ्या माणसाने म्हातारपणाची व अंतकाळची काळजी करू नये.
- तुम्ही जे नाम घेता ते मीच घेववतो ही भावना ठेवा. त्यात माझी संगत लाभेल. अंतकाळचे कष्ट जाणवणार नाहीत.
- मन विषयाकार होऊ लागले की माझे स्मरण करावे.
- बर्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे म्हणजे पुढे पुढे माझी लवकर लवकर आठवण होऊ लागेल. माझे होणे कठीण नाही.
-------------------------------------------------------------------
सर्व सोडून मला शरण यावे
- मी सांगितलेले स्मरणात ठेवावे.
- माझ्या सांगण्य़ात मी आहे
- मला दुसरे कोठे पाहू नये
- तुम्ही नाम तेवढे जतन करावे
- नामात मन ठेवावे
- हेच माझे खरे दर्शन आहे
- रात्रं-दिवस असे चित्तांत आणावे की "मी तुम्हाला शरण आहे. मला शरण व्हायला शिकवा"
- शेवटी सांगतो, नामाला शरण जा.
- मी नामाहून वेगळा नाही.
- मग तुमच्या अंतकाळी मी उशाशी आहे ...
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥जानकी जीवनस्मरण जय जय राम ॥
॥श्रीराम समर्थ॥