श्रीतुकामाईंचे अंतरंगातील शिष्य
----------------------------------
खर्या जिज्ञासूशी ते फारच प्रेमळपणे वागत असत.
त्यांचे बोलणे गूढ असे, पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर समजे.
ज्याचा त्याचा अधिकार पाहून तुकामाई योग/भक्ति/दानधर्म/तीर्थयात्रा करायला सांगत.
साधारणपणे भगवंताचे नामस्मरण करा व त्याला शरण जा, त्याच्यावर विश्वास ठेवा हेच ते सांगत.
माणसाने अंतराकडे खरे लक्ष पुरवावे असे ते सांगत
नाम व संतसेवा करावी. त्याने सर्व साधते हाच उपदेश ते सर्वांना करीत.
------------------------------------
श्रीतुकामाईंच्या कसोटीला उतरणे खूपच कठीण असे. त्यांच्या कसोट्या या प्रमाणे असत..
- लाकडे फोडून घेणे
- पाणी भरुन घेणे (नदीवरून)
- उष्टी काढून घेणे
- देवपूजा करून घेणे
- मठात पडेल ते काम करायला सांगणे
- झोप लागेपर्यंत पाय चेपून घेणे
- मठात अन्न न देणे, बाहेर भिक्षा मागू न देणे
- शिव्या देणे
- मार देणे
- स्वतः नाहीसे होणे (शोधणारा दमून जाई व उपाशी राही)
- हाकलून देणे
या देहकष्टांना व मानहानीला कंटाळून बरेचसे साधक निघून जात. मात्र जे टिकत त्यांना तुकामाई पोटाशी घेत असत. त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत. आणि आपण असं का करतो याचं स्पष्टीकरण देत.
साधकाची गुरुच्या ठिकाणी संपूर्ण निष्ठा येणं आणि त्याची देहबुध्दी नाहीशी होणं आवश्यक असे. शिवाय बाहेरचे लोक ज्याप्रकारे नंतर दुष्टबुध्दीने वागतात त्याला शांतपणे तोंड देणे शिष्यांना शक्य होई.
त्यामुळे ४-५ च अंतरंगातील शिष्य झाले.
१) गणपती कुलकर्णी (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराज) - या १४ वर्षांच्या थोर सत्शिष्याला श्रीतुकामाईंनी आपले हृदयच काढून दिले.
२) बाबा नागरे नावाचा कुणबी - त्याला त्रिकालज्ञानाची देणगी मिळाली
३) दत्ताराम - याला योगविद्या मिळाली. याची तुकामाईंवर संपूर्ण निष्ठा होती.
४) शेषराव माजलगावकरांचा मुलगा - यानं मठाला पूर्ण वाहून घेतलं
५) मारूति - याला श्रीतुकामाईंच्या मांडीवर मृत्यू आला. प्राण जाताना तो तुकाराम तुकाराम म्हणत होता. त्याचे पुढचे सर्व संस्कार तुकामाईंनी केले.
६) पाटोद्याच्या सीतारामपंतांचा मुलगा बापू. याला १२ वर्षे त्यानं सेवा केल्यानंतर त्याला समाधीचा अनुभव दिला
॥श्रीराम समर्थ॥