तुकामाईंचं अवलियेपण
------------------------
१) सूर्यग्रहणाच्या पर्वकालात एका बंद खोलीतून श्रीतुकामाई दोन जणांना बरोबर घेऊन नाहीसं झाले व गोदावरीत स्नान करून ओळखीच्या लोकांना भेटून परत त्याच खोलीत परत आले.
२) तुकामाईंना पाहण्यासाठी पुसदला प्रचंड गर्दी झाल्यावर पोलिस इन्स्पेक्टरने त्यांना नरसिंह मंदिरात बंद करून ठेवलं. त्यावर तुकामाई अचानक नदीच्या वाळवंटावर प्रकट झाले व त्यांनी लोकांना दर्शन दिले.
३) तुपेगावच्या पाटलानं तुकामाईंना एका खोलीत कोंडून ठेवलं जेणेकरुन ते कुठे जाणार नाहीत आणि गोचरस्वामींना त्यांना भेटता येईल. त्यावर तुकामाई अदृश्य झाले. ते स्वामींना दोन मैलावरच्या एका उसाच्या मळ्यात भेटले.
४) उमरखेडला असताना श्रीतुकामाई गोचरस्वामींचे कीर्तन ऐकताना अचानक बाहेर आले आणि नाहीसे झाले. दुसर्या दिवशी द्वादशीला भोजनासाठी त्यांना शोधायला गेलेल्या माणसांना ते वेशीवर बसलेले दिसले. काल कोठे होता विचारल्यावर ते म्हणाले की मी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलो.
५) काहीजणांबरोबर परमार्थातील काही गुह्ये सांगत असता ऐकणार्यांच्या निष्ठेची प्रचीती घेण्यासाठी त्यांनी अचानक भल्या मोठ्या वाघाचे रुप घेतल्यावर तीन निष्ठावंत वगळता बाकीचे पळून गेले.
६) मारुति या शिष्याच्या विनंतीनुसार त्यांनी चालणार्या घोडा, त्यावर बसलेले जोडपे या सर्वांना नुसते "हर हर हर" म्हणून २-३ तासांच्या समाधीचा अनुभव दिला.
७) उमरखेडला चिन्मयानंदांच्या पुण्यतिथीच्या उत्सवात अचानक श्रीतुकामाई आले. त्यांना साष्टांग नमस्कार घालून हाताला धरुन एका पानावर भोजनासाठी गोचरस्वामींनी बसवले. तेव्हा पंगतीत बसलेल्या ब्राह्मणांनी निषेध व्यक्त केला. त्यावर श्रीतुकामाई उठले आणि मंडपातून नाहीसे झाले. त्यावर मंडळींच्या पानातल्या अन्नात किडे वळवळायला लागले.
गोचरस्वामींना हे कळल्यावर ते आपल्या थोर गुरुबंधूंचा एका ब्रह्मज्ञानी पुरुषाचा अपमान झाल्याने असे घडले असे म्हणाले.
तुकामाई शोधायला आलेल्या माणसांना एका आध्यात्मिक अधिकार्याबरोबर कांदाभाकरी खाताना दिसले. त्यांना मंडपात विनवणी करुन नेलं. समाधीचं तीर्थ तुकामाईंनी पानातल्या अन्नावर शिंपडायला सांगितलं. तेव्हा अन्न पूर्ववत झालं व सर्वजण जेवले.
८) पूर्णा नदीच्या पुरात नाव बुडून वाहून जात असताना त्यात बसलेले त्यांचे भक्त श्रीतुकामाईंचे धावा करु लागले. तेव्हा त्यांनी ती नाव पाण्य़ाचा एक मोठा लोंढा तिच्याकडे वळवून तिला तीरापाशी ढकलली व माणसांचे प्राण वाचले. तेव्हा तुकामाई देवीच्या देवळात बसले होते. त्यांचे कपडे अचानक ओले झाले.
९) पुसदला देशमुखबाईंच्या ५० जणांच्या शिध्यात श्रीतुकामाईच्या कृपेने ४०० माणूस जेवलं.
१०) एका वर्षी एकही आंबा लागला नव्हता, पण एका बाईची आंब्याची गाडी बोलावून सार्या गावाला श्रीतुकामाईंनी आमरस खाऊ घातला.
११) हुक्क्यात अग्नी नसताना श्रीतुकामाईंनी हुक्का ओढला तर पडद्याच्या आत ठेवलेल्या हुक्क्यातून ज्वाला उसळल्या व तंबूला आग लागली...अशा प्रकारे परीक्षा करणार्या नबाबाची जिरवली.
॥श्रीराम समर्थ॥
॥श्रीराम समर्थ॥