अधिकमास

अधिकमास -
-------------------------
माझी अधार्मिकता -
सुमारे ३० वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये असताना, नवीन कानातले घेण्यासाठी तुळशीबागेत मी मैत्रिणींबरोबर फ़ेरफ़टका मारायला जायची. एके दिवशी शनिपारापाशी मला, ‘अधिकाच्या जावईवाणासाठी अनारसे, म्हैसूरपाक तयार आहेत’,

अशी पाटी दिसली होती. घरी आल्यावर मी आईजवळ चौकशी केली, तेव्हा कळलं की, अधिक महिन्यात लेक व जावयाला ३३ अनारसे एका कोर्‍या ताटात घालून वाण म्हणून देतात. मग मी विचारलं की, “अधिकातच का? अनारसेच का? ३३ च का?” तेव्हा, "जास्त प्रश्न विचारू नकोस, हे असंच करायचं असतं", असं काहीसं उत्तर मिळाल्याचं किंवा मी स्मरणात ठेवल्याचं मला आठवतंय. “जग कुठं चाललंय? आणि ही कसली वाणं?” इ. बोलून मी नाकही मुरडलं होतं, तोंड वाकडं करून हसलेही होते.

नुकतंच विज्ञानयुग येऊ घतलं होतं. चंद्रावर माणूस पोचला होता. मी विज्ञानशाखेची असल्यामुळे व वर्मानपत्रातून अंधश्रद्धा, जुन्या कालबाह्य रूढी, परंपरा यांच्यावर झोड उठवली जात असल्यामुळे मी ही या प्रकाराला ‘बुरसटपणा’ म्हटले होते. मात्र अशा रूढी पाळणारी जनता काही प्रमाणात असते व चंद्रावर माणूस जाऊन पोचल्यामुळे तिला काही फ़रक पडत नसतो, हे लक्षात राहिलं होतं.

त्यानंतर कितीएक अधिक मास आले आणि गेले. अधिक मासाप्रमाणे दिवाळी मागेपुढे होते एवढं माझ्या लक्षात येत असे. बाकी माझं रूटीन चालू राहात होतं.
-----------------
माझा पहिला अधिक मास -
सन २००४ मध्ये अण्णा गेल्यानंतर त्याच वर्षी श्रावण हा अधिक मास आला. हा बर्‍याच वर्षांनी आल्यामुळे गावात खूप धामधूम चालू होती. नुकतेच वैशाख – ज्येष्ठात (जूनमध्ये) श्रीरामरक्षेचे ३९०० पाठ करून झाले होते. कणकवलीला श्री. करंबेळकर गुरुजींकडे भेटायला गेल्यावर त्यांनी अधिक मासाचं महत्त्व सांगितलं. ‘अधिकस्य अधिकं फ़लम्‌।’ या काळात जप केला तर अधिक पटीने त्याचं फ़ळ मिळतं. संकल्प एकच, ‘श्रीरामचंद्रप्रीत्यर्थ।’ पुन्हा एकदा त्यांनी श्रीरामरक्षेचे ३९०० पाठ करून घ्यायला सांगितले.
मी पुण्यात परत आले. बाबू गेनू चौकात फ़ुलं आणायला गेले असताना, अधिक मासाविषयी पुस्तिका पाहिली, ती घेऊन घरी आले. त्यामधली माहिती वाचली. विविध व्रतांविषयी चाळलं. शेवटी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हा मंत्रजप महिनाभर करायचा ठरवला, तो श्रीविष्णूला अर्पण करायचा असं आमच्या पुरोहितांकडून ऐकलं. महिनाअखेरीस दोन्ही पूर्ण झालं. अधिकात केल्यामुळे ब्राह्मणभोजनही घातलं. त्याचंही पुण्य घेतलं.
नेम म्हणून जप करताना माझी फ़ाफ़लली होती. एकच माळ ती करायची, पण रोजच्या व्यवसायाच्या धकाधकीत लक्षात ठेऊन ती करणं महामुष्किलीचं होतं. पुढं मी ‘धर्मसिंधू’ व ‘निर्णयसिंधू’ मध्ये या अधिकमासाविषयी अधिक खुलासेवार वाचलं. त्यात मला समाधानकारक उत्तरं मिळाली. मी आंधळेपणाने काही करत नाहीये याची खात्री पटली.
----------------------
दुसरा अधिकमास -
सन २००७ मध्ये अधिक ज्येष्ठ आला होता. महाराजांचा अनुग्रह घेऊन १ वर्ष झाले होते. अधिकमासाच्या नेमाविषयी महाराजांनी सांगितलेलं प्रवचनाच्या पुस्तकात वाचलं त्याप्रमाणे मी माझा दैनंदिन जप थोडा वाढवला.
महिनाअखेरीला चित्तपावन संघाच्या कॅलेंडरमागे वर्षभरातले सणवार–कुळाचार इ. वाचताना अधिकमासाविषयी मी माहिती मिळवली.
त्यात आईवडिलांच्या पूजनाविषयी लिहिलं होतं पाद्यपूजा, भोजन, वस्त्रं, हार, तांबूल, औक्षण, दक्षिणा असा दणदणीत बेत ठरवला. यजमानांनी आनंदानं होकार भरला. सर्व तयारी केले. आईवडिलांना थोडक्यात बेत कळवला. त्यांनीही आनंदानं मान्य केलं. मनाप्रमाणे सर्व झालं. दोघांच्या पायावर डोकं ठेवताना मी मनातल्या मनात माझ्या चुकांबद्दल माफ़ी मागितली

मला उशीरा का होईना आलेली अक्कल
लहानपणी, तरूणपणी, थेरपीच्या काळात, जाणता-अजाणता मी आईवडिलांपुढे केलेले क्वचित मूर्खासारखे हट्ट, घातलेला वाद, बोललेले बोचरे शब्द, मनासारखं न झाल्यामुळं केलेला थयथयाट, काढलेले वाभाडे, कृतघ्नपणा, मस्तवालपणा, उणीदुणी याविषयी आठवून नंतर मला माझीच शरम वाटली होती. त्यांची क्षमा मागायचा प्रसंग जणू या अधिकाच्या निमित्ताने रामरायानं माझ्या पुढे आणला.

आईवडिलही सर्वसामान्य माणसंच!
मी शांतपणे लक्षात घेतलं की तीही माणसंच आहेत, परमेश्वर नाहीत, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी त्यांच्या काळाला, स्वभावाला अनुसरून केलं असेल. ते माझ्या अपेक्षेप्रमाणे नसेलही.

माझा धाकटा मुलगा वयात आल्यावर जेव्हा हट्ट करायचा, कांगावा करायचा तेव्हा माझ्या हृदयाला बोचत असे. आता माझ्या मनात येतंय, ‘ असंच मी केलेलं/बोललेलं माझ्या आईवडिलांनाही बोचलं असेल.’

पूजनानंतर मी जेव्हा त्यांच्या पावलावर माझं डोकं ठेवून क्षमा मागितली तेव्हा मला बरं वाटलं.
आईनं मला व तिच्या जावयांना अनारशाचं ताट दिलं नाही, याची बोच माझ्या मनातून गेली. तिला जे शक्य झालं, जे करावसं वाटलं ते तिनं केलं. तिनं माझं काही विशेष करावं हा माझा हक्क असू शकत नाही. हक्क, अधिकार, मागणी, हट्ट, आग्रह यातून अपेक्षाभंग, द्वेष निर्माण होतो हे मला समजलं ही गुरुरायाची कृपा.

महाराजांची शिकवण -
महाराज मला वारंवार आतून बजावतातही, ‘कोणा मागू नका काही.’ जमलं तर दान द्यावं. त्याविषयी वाच्यताही करू नये.

दोन्ही घरांसाठी प्रार्थना -
माझ्या आईवडिलांच्या पावलांवर डोकं ठेवून झाल्यावर गव्हाच्या राशीवर काशाचा दीप लावला व तो देवापुढं ठेवला आणि दोन्ही कुलांचा उद्धार करावा अशी प्रार्थना केली. यजमानांनी मनापासून सहकार्य केल्यानं दुधात साखर पडली होती.

मानलेल्या मुलीला व जावयाला वाण
त्याच मासात एकदा नणंदेच्या मुलीला व जावयाला रात्रीचं घरी बोलावलं. त्यांच्या दोन्ही आवळ्या-जावळ्या मुलींकडे आम्ही ‘आमच्या मुली’ असं कायम पाहिलेलं. जावई तर लाखात एक. अतिशय शांत, समंजस, परिपक्व, हसरा, मनमिळावू, गर्वाचा लवलेश नाही, मदतीला तत्पर. दोघांची लक्ष्मी-नारायण समजून आम्ही उभयतांनी पाद्यपूजा केली. सच्छिद्र मिठाई नव्या ताटात घालून दिली. भाचीची ओटी भरली, जावयांना नरळ दिला. सर्वांना मिष्टान्नाचं भोजन दिलं. दक्षिणा-तांबूलासह सगळं साग्रसंगीत झाल्यावर मला कृतकृत्य वाटलं.
असं मी काही करीन असं जर मला माझ्या तरूणपणी कोणी म्हटलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं.
----------------------------
मिळालेलं शहाणपण -
दुसर्‍यांनी काही दिल्यावर ओझं वाटतं, संकोच वाटतो. परतफ़ेडीचा ताण येतो. मात्र मोजक्या आप्तांकडे का होईना, पण परमेश्वराचा अंश म्हणून पाहून, स्मरण–पूजन –दानधर्म मनापासून केला तर एक वेगळंच समाधान वाटतं. मागून मिळणार्‍या सुखापेक्षा देण्याचा आनंद अधिक दाट व सखोल असतो. शिवाय देणार्‍याला देव देतो! हे अनुभवाला आलं.
‘हे परमेश्वरा, तुझी सेवा तूच माझ्याकडून करून घे’, अशीच प्रार्थना मनात येते.
शिवाय मनातले सल, द्वेष, अपमान, शरम या सर्वांवर मनापासून केलेले दान हा केवढा जालिम उपाय आहे, हे प्रचीतीला आलं.
हे कर्म सुचवणारा परमेश्वर, अर्पण होणार्‍या वस्तू परमेश्वर, जो घेतो तो परमेश्वर, जो देतो तो परमेश्वर, शेवटी कर्मही विष्णूला समर्पण, इदम्‌ न मम।

हे सर्वच कर्म परमात्म्याचं स्मरण करण्याचं निमित्त झालं आणि त्याची मला गंमत वाटली.
----------------------------------------------
सन २०१० मधील अधिक मास
हा हा म्हणता तिसरा अधिक मास आला.
या वर्षी अधिक वैशाख आहे.
तो १५ एप्रिल ते १४ मे पर्यंत आहे.
ऐन ग्रीष्म ऋतू चालू होईल. गरम हवेनं लाहीलाही होईल.
या अधिक मासामुळे अक्षय्यतृतीया पुढं ढकलली गेली. हिमालयातील केदारनाथ, बद्रीनाथ मंदिराची दारे उशीरा उघडली जातील.
नुकतेच चैत्रात माझे प.पू. वडिल स्वर्गवासी झाले. माझे पूजन स्वीकारायला माझी वयोवृध्द आई आहे.
व्यवसायाच्या धकाधकीत जप किती होतो पहायचं.
सर्व रामरायावर सोडून दिलेलं आहे.
तो म्हणेल तसं कारायचं.

॥श्रीराम समर्थ॥