साडेसाती - पनवती - शनिपीडा
----------------------------
साडेसाती एक कॉमन गोष्ट -
एखाद्याच्या घरी आर्थिक, कौटुंबिक उलथापालथ झालेली दिसली , अगदी होत्याचं नव्हतं झालं, चिंता, काळजी, भांडणं, अपयश, भाऊबंदकी, कर्जबाजारीपण इ. दिसलं की, “काय पनवती का?”, असं अगदी थोड्या ओळखीचा हितचिंतकसुद्धा त्या गांजलेल्या, पिडलेल्या माणसाला हळूच विचारतो.
---------------------
माझे लहानपण -
मला आठवलं, मी शाळेत असताना आई शनिमाहात्म्य वाचायची. कोणासाठी, कशासाठी ते काही आठवत नाही. तो काळ फ़ारच वाईट गेला होता. त्यातून सावरायला आम्हाला बराच वेळ लागला होता.
------------------------
आमच्या मुलांची साडेसाती -
आमच्याकडे जेव्हा मुलांची साडेसाती चालू आहे हे मला कळलं तेव्हा मोठ्या मुलाची समन्वयची संपत आली होती, धाकट्या सनातनची अर्धीअधिक संपली होती. किती तरी काळ रात्रंदिवस झुंजण्यात गेला तरी मी धार्मिकदृष्ट्या पुरेशी जागी झालेली नव्हते. आपल्या प्रयत्नानं संकटावर मात करता येते अशा भ्रमात मी होते.
अण्णा २००४ मध्ये गेल्यावर त्यांना त्रिपाद लागलंय आणि शांति करावी लागणार असं ऐकल्यावर मात्र मी पुरती हादरले होते. काय करावं म्हणजे अघटित घडणार नाही या विचारानं मी बेचैन झाले होते. एके दिवशी बाजारात गेल्यावर अचानक मी चक्क पंचांग विकत घेतलं आणि मांडी ठोकून खाली मुंडी घालून भारतीय काळवेळ-ग्रह-नक्षत्र शुभ-अशुभ या गोष्टींचा शोध घ्यायला लागले. गुरुपालट, शनिपालट इ वाचलं. तेव्हा मला आमच्या मुलांच्या शनिपीडेविषयी समजलं. मी मग त्याविषयी सर्वच समजून घ्याय़च्या खटपटीला लागले. विविध अनुभव घेण्यात सनातनची पनवती संपली, वर्ष–दीडवर्ष सरलं, आणि मग मी हुश्श केलं. आता असं वाटलं की इतरांना आपले अनुभव सांगावेत.
--------------------
मध्यमवयातील माझ्यातील आई
सन २००४ मध्ये मी चक्क रस्त्यावर, बाबू गेनू चौकात शनिमाहात्म्य विकत घेतलं. मी आता एक पोक्त, धार्मिक गृहिणी व वयात आलेल्या मुलांची जबाबदार आई झाल्याचं मला जाणवलं.
-----------------------------
शनिभक्त/भिक्षेकरी
शनिवारी, शनिच्या पारावर वर्षानुवर्ष मी शनिभक्तांना हातात तबक, नारळ, फ़ुलं, रुईच्या माळा वगैरे घेऊन उभे राहिलेले पाहिले आहेत. अगदी थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता.
दोन्ही बाजूंनी बसलेली भिक्षेकर्यांची रांग, महारोगी, अपंग, लेकुरवाळ्या, जख्ख म्हातार्या.
देवाला वाहिलेल्या तेलानं देऊळ चिकट होतं इ. मी ऐकून होते. या रांगेत मी कधी उभी राहीन असं जर मला कोणी सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. शिवाय रुईची झाडं ओरबाडणार्यांचा मला पूर्वी राग यायचा.
-------------------------------
मीही अशा रांगेत उभी
सुरुवातीला मी रांगेत उभं राहून दक्षिणामुखी शनिमारुतीच्या मंदिरात जाऊन फ़क्त दर्शन घेतलं.
इतर देवळं
इतर देवळं कशी मोठी असतात, उंच शिखर–पताका, गर्भगृह, सजवलेल्या मूर्ती, सोवळ्यातले पुजारी, प्रासंगिक आराशीनं लखलखणारा देखावा, पुढे मोठे सभागृह, पुराणिक–कीर्तनकारांची लाकडी खुर्ची, नक्षीदार शिसवी खांब, लटकलेली रंगीबेरंगी झुंबरं, पुढं वाहन, कासव, नंदी, गरुड, मारुती.
शनिचं देऊळ
तसं इथं काहीच नव्हतं. अगदी छोटीशी देवळी, उभं राहायलाही जागा नाही. भर रस्त्यात देऊळ होत. भक्तांच्या डोक्यावर छत नाही,. उभ्या राहिलेल्या माणसांच्या चेहेर्यावर चिंता होती. रांगेत इथं स्त्रिया कमीच दिसल्या.
इथे येऊन मला काय वाटतंय, ते मला आजमावायचं होतं.
शनिभक्त काय करतात?
इतर मंडळी काय काय करतात त्याचं मी निरीक्षण करत गेले. नारळ, रुईच्या पानांचे हार, काळ्या-जांभळ्या फ़ुलांचे हार, तेलाची वाटी, त्यात काळे उडीद–मीठ घालून अर्पण केले जातात. कोणी कणकेचे दिवे लावीत असत.
भिक्षेकरी
भिक्षेकर्यांकडे पाहाताना मला खूप कणव आली. यथावकाश काही दानधर्म हातून झाला. एकदा वाटलं मी ही कधी तरी पूर्वी एखाद्या जन्मी अशीच भिक्षा मागितली असेल. अवहेलना सोसली असेल. भिक्षेवर चिकाटीनं जगून थंडी-वारा-ऊन सोसून, खंगून प्राण सोडला असेल. त्यावेळी ज्यांनी दानधर्म केला म्हणून मला अन्न–वस्त्र मिळालं त्यांचे मला आता आभार मानावेसे वाटले.
दरिद्रीनारायण
भिक्षेकर्यांच्या कधी नव्हे ते डोळ्यात बघायचं धैर्य मला आलं. त्यांनी भिक्षा घेतली यानं मलाच कृतकृत्य वाटलं. वाटलं परमेश्वर आपली परीक्षा घेतोय. दरिद्री नारायणाच्या अवतारात येऊन तो माझं मन पाहातोय. माझ्या मनाची मलिनता कमी होऊन स्नेह, औदार्यानं ते भरू लागलं. केव्हढी ही देवाची कृपा!
मीही एक शनिभक्त झाले
शनिचं देऊळ इतर देवळांपेक्षा वेगळं कसं हे मी समजून घेण्याच्या मागे लागले. ते समजून घेतल्यावर मी ही जवळच्या एकदा हातगाडीवर त्या वस्तू घेतल्या, रांगेत उभी राहिले. मी मूर्तीपुढं उभं राहाण्याची वेळ आल्यावर हातातल्या सामानाचं काय करायचं ते मला समजेना. दोन जण पुजारी डावी, उजवीकडे उभे होते, त्यांनी त्या वस्तूंचा ताबा घेतला. भराभरा गोष्टी घडल्या. मी बाहेर येऊन प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालताना शनिमंत्र म्हणला.
यथावकाश शनिपुढे वस्तू अर्पण करण्याला मी सरावले. मागं लोक उन्हात उभं राहात असल्यानं घाई करीत असतात. या अनुभवातून मी गर्दीची वेळ कोणती, निवांत वेळ कोणती ते शोधून काढलं. वस्तू अर्पण करताना आपण एव्हढंच करतोय, मात्र एकचितानं शनिदेवाचं दर्शन घेणं, त्याला नमस्कार करणं होत नाही असं माझ्या लक्षात आलं. जवळच्या मारुतिरायाकडे - श्रीरामाच्या परमभक्ताकडे माझं लक्ष गेलं.
मग मी दोन्हीही जमवायला शिकले. दक्षिणा, नैवेद्य, उदबत्त्या, कापूर, मारुतीरायासाठी तेल, पिवळी फ़ुलं इ. घरून न्यायला लागले. मग मी शनिवारसाठी एक kit bag केली व ती शुक्रवारीच सज्ज करू लागले. शक्यतो वस्तू घरूनच नेण्याची सवय करू लागले. हे सगळं करताना मी एक आई होते, एक होऊ घातलेली भाविक होते.
शनिमारुतिचं दर्शन घेतल्यावर मला खूप प्रसन्नता वाटू लागली. शनिवारी काहीही करून दर्शनाला जाणं मला आह्वानाचं वाटलं.
शनिला अभिषेक
मग समोरच्या पानपट्टीच्या दुकानात जाऊन शनिवारच्या अभिषेकाची पावती फ़ाडण्याचा कार्यक्रम चालू केला. अजूनही शनिप्रदोष, शनिअमावास्या, शनैश्वरजयंती या दिवशी मी आठवणीने अभिषेक करते.
एकदा दक्षिणामुखी शनिमारुतीसमोर फ़ारच गर्दी दिसली. मग मी पुण्यातल्या जवळच्या इतर देवळांची चौकशी केली. भिकारदास मारुती, शनिपार, मंडईतला शनिमारुती यांचीही दर्शनं अधूनमधून मी घेत असे.
इतरांची हौशीनं वरात
हळूहळू दोन्ही मुलं, यजमान, साडेसाती असलेल्या मुलीबाळी यांनाही प्रोत्साहित करून मी सगळ्यांची उत्साहानं वरात काढत असे. कित्येक जणांशी याविषयी बोलणं, पुस्तकवाचन, तत्त्वविवेचन, उपासनापद्धती याबद्दल माहिती देणं, घेणं केलं. “मॅडम चक्क तुम्ही?”, असंही हसत ऐकलं.
शनि-शिंगणापूर
एके दिवशी यजमान सोडून मी व मुलं असं कुटुंब परिचितांबरोबर रांजणगाव महागणपती, शिर्डी साईबाबा व येताना शनि-शिंगणापूरला गेलो. तो अनुभव अफ़लातून होता. मी तेथील स्थानमाहात्म्याविषयी पुस्तकं घेतली आणि घरी आल्यावर एका बैठकीत वाचून काढली.
एका वेगळ्याच दुनियेत मी गेले होते. शनिभक्तांचं किती वेगळं जग होतं हे! मला माहीतच नव्हतं. एका आगळ्यावेगळ्या अनुभवाबद्दल मी देवाचे आभार मानले. अनेकांना तेथे जाण्याबद्दल प्रोत्साहित करून पाहिलं. फ़ारसं कोणी गेल्याचं मला आठवत नाही.
देशापरदेशात त्या शनिदेवाच्या प्रतिकृती निघाल्या आहेत, असं कोणी मला सांगितलं. शिर्डी व तिरुपती बालाजीप्रमाणेच. तेवढीच भक्तांची सोय.
महाराज व शनिदेव
यथावकाश महाराजांचा अनुग्रह घेतल्यावर त्यांचं चरित्र वाचलं तेव्हा शनिदेव हा फ़ौजदार आहे, हे त्यांचं वाक्य मला फ़ारच आवडलं.
पैसा, विद्या, सत्ता, सौंदर्य, संपत्ती, धनधान्य इ. मुळे आलेल्या ‘मी कर्ता’ या गर्वाच्या फ़ुग्याला टाचणी लावण्याचं काम शनिदेव करतात. भली भली नास्तिक, अर्धवट आस्तिक माणसं नाक घासून मुकाट्यानं त्यांना शरण येतात. वठणीवर येतात. सरळपणे वागतात. खूप मोठा धडा शिकतात की, “‘माझ्या मर्जीप्रमाणे मला हवं ते मिळायला पाहिजे’, हा हट्ट कायम चालत नाही. माझ्यावर, सार्या विश्वावर ज्याची हुकूमत आहे, त्याचं भान मला कधी यायचं?” साधं, समजुतीनं सांगून माणसं बधत नाहीत. त्यांना आसूडाचे फ़टकारेच लागतात. सर्व तर्कबुद्धी, हुषारी पणाला लावूनही अपयशाचं रहस्य उलगडत नाही तेव्हा साडेसातीविषयी समजतं. आणि माणूस खर्या अर्थानं आस्तिक होण्याची संधी मिळवतो.
माझं चिंतन -
मला तर एकदा चिंतन करताना असं वाटलं की आपल्यामधलं सगळं काळेपण (तमोगुण) शनिदेवाच्या रूपानं पुढं उभं आहे. त्याला पापग्रह म्हणतात. म्हणजे कुंडलीतल्या कोणत्या स्थानात तो आहे, त्यावरून कोणत्या प्रकारची पीडा, का होतेय ते समजतं. पापी आपण असतो. कुंडली हा जन्मवेळचा आरसा आहे. शनिमहाराज आपल्यातलं काळेपण दाखवतात, आपल्याला सावध करतात.
आपल्या मनातल्या आंधळ्या आशा, अपेक्षा, इच्छा, वासना, तृष्णा, महत्त्वाकांक्षा व त्यामुळे निर्माण झालेलं अपेक्षाभंगाचं दु:ख, खेद, संताप, द्वेष, असूया, मत्सर यशाचा गर्व, अभिमान, मस्ती, बेमुर्वतपणा, लबाडी, फ़सवणूक, चढावलेला, निर्ढावलेला कोडगेपणा, बेशरमपणा कमी होणार कसा?
दर ३० वर्षांनी शनिमहाराज आपल्या राशीला येतात. ७॥ वर्ष आपल्याला ठोकून सरळ करतात. पुढं जातात. आता नंतर आपली शेपूट कुत्र्याची ठेवायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.
शनिदेव कुणावर मेहेरबान
ज्यांच्या घरी कुळधर्म, कुळाचार चालतात, श्राद्धपक्ष भाविकेतेने केले जातात, देवपूजा होते, प्रासंगिक होमहवन होतं, दानं दिली जातात, नित्य जपजाप्य होतं, सद्गुरुंचे आशीर्वाद ज्या घराण्याला असतात, परमेश्वरी सत्ता मानणारे भाविकजन ज्या घरात राहातात अशांना शनिमहाराज त्रास देत नाहीत.
----------------------------
"मी कर्ता ते तू कर्ता" ही वाटचाल वाचकांची व्हावी हीच सदिच्छा!
----------------------------------------------
शनिमहाराजांविषयी तांत्रिक माहिती
सूर्यमालेतील दूरवरचा एक ग्रह
सात वारांपैकी एक वार – शनिच्या नावाने
पौराणिक जन्मकथा - त्रैलोक्यातील स्व:(स्वर्ग) यातील शेवटचा लोक
सूर्य व संज्ञा पूत्र, यमाचा मोठा भाऊ
या विषयी अधिक नवग्रहपूजनात लिहिलय ते वाचावं.
---------------
गावाच्या वेशीबाहेर शनिमारुतीचे मंदिर बांधण्याची पद्धत. म्हणून रुईचा हार. रुईची फुलं जांभळी-काळी म्हणून वाहतात.
सर्वात कोपी, उग्र देव म्हणून प्रसिद्ध
जप, पूजा, दान इ. विषयी पंचांगात माहिती (पहा नवग्रह पूजन)
द्वेष, मत्सरापेक्षा भगवंताविषयी स्नेह, प्रेम यांची जोपासना व्हावे म्हणून तेलाचं महत्त्व
शनिपूजेचे मला कळलेले महत्व
जीवन हे चढ-उतार, सुखदु:ख यांनी संमिश्र आहे. ते कोणालाच चुकले नाहीत. तेव्हा माज, गर्व, मस्ती, उद्दामपणा फ़ार काळ चालू शकत नाही याची जाणीव व्हावी, तसंच खेद, खंत, निराशा यातून बाहेर यावे, यासाठी स्वत:मधला तमोगुण अर्पण करायचा या उद्देशाने काळे उडीद, काळ्या वस्तू - वस्त्रे यांचे दान करावे. धूमयान हा नरकाकडे जाणारा अंधाराचा - तमाचा मार्ग, तो सोडून १८० डिग्री वळून प्रकाशमान, सात्विकतेची कांस धरावी याची कठोर शिकवण त्यांच्यापासून मिळते.
देह सुटल्यावर पापांचे प्रायश्चित्त नरकात भोगायला लागू नये यासाठी देहात असतानाच हरिप्रेमाची, हरिभक्तीची गोडी वेळीच आपल्यामध्ये यावी, टिकावी, वाढावी, ज्यायोगे अखेरचा श्वास सुटताना ‘रामनाम’ मुखी यावे, याकरीता शनिमहाराजांची योजना, मायेने, परमेश्वरी शक्तीने केली आहे.