उपाय कोणाकडून होतात?
---------------
- घराण्यातील समंजस, निःस्वार्थी, संवेदनशील व्यक्तीला अतिशय मानसिक क्लेश होतात.
- तिला/त्याला असे वाटत राहते की जे चाललय ते बरोबर चालले नाही. काहीतरी महत्वाचे करायचे राहतेय, चुकतय.. ती टोचणी
रात्रीची झोप उडवते. अशी व्यक्ती घरातील इतरांना समजावून सांगण्याचा परोपरीने प्रयत्न करते. परिणामी ती एकटी पडते. जिवंतपणी मरणप्राय मानसिक वेदना ती अनुभवते.
- शेवटी ती देवाला शरण जाते.
- तिला मार्गदर्शन मिळण्याची सोय देव करतो.
- तिला या मार्गातून परावृत्त करून तिचा बुध्दिभेद करण्याचे प्रयत्न तिच्या घरातल्या माणसांकडून होतात.
- तिच्या अनन्यतेची परमेश्वर कसोटी बघतो.
- जर ती देवाला धरून राहिली व सर्व घराण्याच्या परिमार्जनाची व उन्नतीची तिने इच्छा धरली तर परमेश्वर तिची निःस्वार्थी आस पूर्ण करतो व तिला समाधानी बनवून आपल्या भजनी लावून तिच्यावर कृपा करतो.
-------------------------------------------
अशा व्यक्तीने कायकाय करावे?
- प्रथम आपले कुलदैवत व कुलदेवता कोण आहेत ते शोधावे. बरेचदा चुकीची माहिती घरातल्या ज्येष्ठांना असते. ती माहिती तपासावी.
- त्यांची मूळ स्थाने कोठे आहेत हे शोधावे.
- घरी देवघरात पंचायतन आहे की नाही ते बघावे. कित्येक घरात पूजाच होत नाही. कोणते पंचायतन आहे ते माहित नसते.
- घरी यथासांग देवतांची प्रतिष्ठापना करून नियमित पूजा सुरू करावी.
- प्रत्येक वद्य चतुर्दशीला उपाध्यायांकडून चंडीपाठ (सप्तशती) करवून घ्यावा. त्यादिवशी कुलदेवतांची माफी मागून त्यांची कृपायाचना करावी.
- कुलाचारांची नीट माहिती करून घेऊन ते सुरु करावेत.
- श्राध्द-पक्ष उपाध्यायांना विचारून सुरु करावेत. कदाचित त्रिपिंडी, नारायणबली-नागबली करावा लागेल.
- कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नये.
- दर गुरुवारी श्रीदत्तगुरुंची आळवणी करावी ते कलियुगातील मार्गदर्शक आहेत. ते लवकर प्रसन्न होतात व प्रचीती देतात. ते आपल्याला पुढला मार्ग दाखवतात.
- संध्याकाळी घरात देवापुढे तुपाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी. श्रीमारूतिस्तोत्र व श्रीरामरक्षा म्हणावी.
- सद्ग्रंथ वाचावेत. संतांनी सांगितलेले आपल्या रोजच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.
- सतत देवाची आळवणी करावी.
- "मी केले" या अभिमानापासून जपावे. देवाने माझ्याकडून करवून घेतले हा भाव ठेवावा.
- हातून घडलेल्या चुकांसाठी क्षमा मागावी.
- "तुझे लक्ष असू देत", अशी विनवणी करावी.
॥श्रीराम समर्थ॥