ऐसा करावा काही नेम । जेणे जोडेल आत्माराम ॥
---------------------------------------------------------
चातुर्मासाचा स्त्रियांना सांगितलेला नेम -
- आत्माराम जोडला जाईल असा नेम करावा. शाश्वताचा नेम असावा. त्यामुळे राम कृपा नक्की करेल.
- वाचा-मनाने नेम करावा, ज्यामुळे रघुनंदन संतुष्ट होईल.
- कर्तव्यात शरीर गुंतवावे, ज्यामुळे रघुवीर संतोषेल.
- सतीला पति सोडून दुसरे दैवत नाही, त्याचे गुण-दोष पाहू नयेत. आपले कर्तव्य करावे. पतिव्रताधर्म भारी श्रेष्ठ आहे, अशा सतीला संत महामुनी वंदन करतात.
- पतिआज्ञा प्रमाण मानावी -हेच साध्वीचे लक्षन आहे.
- पतीला उणेपुरे बोलू नये. ते परमात्म्याला आवडत नाही.
- भगवत्कृपेने संतती व संपत्तीची प्राप्ती होत असते..त्यांचे रक्षण करावे. मात्र त्यात मन गुंतू देऊ नये.
- जे पतीला आवडेल तोच आपला धर्म मानावा.
- मनाने भगवंताचे स्मरण करावे, ज्यामुळे जन्म-मरण चुकेल.
- अखंड समाधान राखावे.
- अनुसंधान चुकू देऊ नये.
- प्रपंचात काया गुंतवावी, मन रघुनाथात असावं.
- प्रपंचात खबरदारी राखावी, मन रामावर लावावे. असे केल्याने राम दाता होतो आणि आपल्याला चिंता करण्याचे कारण राहत नाही.
- मुखात नामस्मरण असावे. त्यामुळे रघुनंदनाची कृपा होईल. यावर विश्वास ठेवावा..म्हणजे तसा अनुभव येईल.
- हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवावी.
- आचरण शुध्द राखावे...पवित्रतम अंतःकरण ठेवून मुखाने भगवंताचे स्मरण केले की रघुनंदनाची कृपा होते.
- पतीला रामरूप असे समजून एकदा तरी नमन करावे. त्याचे मनोगत जाणून घ्यावे. त्याप्रमाणे वर्तन करण्याने आपले हित होईल. असा नेम ज्याच्या घरी आहे, त्याच्या दारात राम उभा राहतो.
- आल्या अतिथीला अन्न द्यावे. कोणासही विन्मुख पाठवू नये. राम कर्ता हा भाव ठेवावा, त्यामुळे काही कमी पडणार नाही.
- सर्वांचे उगमस्थान एकच भगवंत असतो हे लक्षात ठेवावे. त्यामुळे कशाचीही भीती वाटणार नाही.
- रामाविना जग पाहू नये. समाधान हीच सत्य खूण आहे.
- जे जे काही पहावे ते ते रामापासून आले हा भाव ठेवावा.
- साक्षित्वाने देहाचा प्रपंच पहावा. अंतरी रघुनाथ भजावा. देहाची गति प्रारब्धाच्या हाती असते असे शास्त्रे सांगतात. मात्र रघुपतीच जगात पाहावा.
- मुखाने रामनाम घ्यावे, हृदयात परमात्म्याचे प्रेम असावे. याहून दुसरा विचार करू नये.
- हा निर्धार ठेवावा. याची या चातुर्मासात करावी. हाच नेम अखंड ठेवावा.
- हा नेम छोटाच आहे, हा करून पहावा. भगवंताचे नाम घ्यावे.
- खात, पीत काम करीत असताना होईल तेवढा नेम करीत जावा.
- नेम परमात्मा पुरा करील हे जाणावे.
- सर्वांनी भगवंत जोडावा.
- सर्वांना माझा आशीर्वाद सांगावा.
॥श्रीराम समर्थ॥