भगवंताचे नाम सोडू नका.
----------------------------
सर्वसामान्य माणूस -
- संकल्पशक्तीचा उपयोग विषयप्राप्तीसाठी करतो. कितीही विषय मिळाले तरी ते अपूर्ण असल्यामुळे माणूस असमाधानी राहतो.
- तो भगवंताचा असूनही भ्रमाने "मी विषयाचा आहे" असे त्याला वाटते.
-------------------------------
पूर्ण समाधान कशाने होते?
- भगवंताच्या प्राप्तीची प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो.
- भगवंत पूर्ण असल्याने, त्याच्या प्राप्तीने भक्ताचे पूर्ण समाधान होते.
- प्रथम भक्ताच्या वासनांची पूर्ण तृप्ती होते, मग त्या क्षीण होतात, नंतर त्या आपोआप नाहीशा होतात.
- म्हणून नेहेमी "भगवंत मला हवा" अशी इच्छा करीत जावे. भगवंताचे नाम घेणे म्हणजे "तू मला हवास" असे म्हणणे होय.
- खर्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला, तर तो नेहेमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो.
- आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो, ही जाणीव ठेवून जगात वागावे म्हणजे, आपल्याला कधीही कमी पडणार नाही.
- भगवंत हावा असे खरोखर ज्याला मनापासून वाटते, त्याचे काम झालेच पाहिजे.
- ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे.
---------------------------------------------
संतांचे महत्व -
- "तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस", असे भक्ताला सांगतात.
- त्यासाठी ते भगवंताचे नाम घ्यायला सांगतात.
--------------------------------
नामाचे महत्व, नाम कसे घ्य़ावे? -
- नामात एक विशेष आहे. विषयाकरीता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम, म्हणजे मन निर्विषय करणे, ते करीतच असते. म्हणून कशाकरीता का होईना, नाम घ्यावं.
- निर्विषय होण्याकरीता नाम घेतलं तर काम शीघ्र होतं.
- साधन तेच, साध्य तेच.
- एक नामच सत्य आहे, यापरते दुसरे सत्य नाही.
- नामपरते दुसरे साधन नाही.
- नाम घेताना, आपण ते कशाकरीत घेतो त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान.
- नाम घेणे म्हणजे "मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे" असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे, ही जाणीव टिकवण्याकरीता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.
- सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे.
महाराजांचा आशीर्वाद -
- तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.
॥श्रीराम समर्थ॥