उज्जैन

कोणतेही पुराण घ्या, पौराणिक कथांचं पुस्तक घ्या, त्यात राजा विक्रमादित्य, अवंतीनगरी, उज्जैन इ संदर्भ सापडणारच. मला वाटायचं की सगळं कल्पित आहे. पण नाही हो! कलियुग ५११० वर्षांपूर्वी चालू झाले तेव्हा राजा युधिष्ठिराचा शक चालू झाला. तो संपल्यानंतर आर्यावर्तात (उत्तर हिंदुस्थानात) राजा विक्रमादित्याचा शक सुरु झाला.
त्याची राजधानी अवंती/उज्जैन नगरी.

------------------------
या नगरीबद्दल अजून विशेष आकर्षण वाटण्याचं कारण म्हणजे महाराज इथे अनेकवेळा आले होते. येथील जंगलातील गुहेत त्यांनी साधन केले होते. आपल्या गुरुंकडून समाधीचा लाभ घेतल्यानंतर ते आत्मज्ञान मुरवण्याकरीता ते एकांतात येथे राहिले होते. त्यांची चरणधूलि येथे आहे.
-----------------------------------------
मी जुलै २००९ मध्ये गुरुनाथच्या श्रावण स्पेशल यात्रेत दाखल झाले.
माझ्या बरोबर २५-३० जण होते. ही यात्रा ओंकारेश्वर-ममलेश्वर-महाकालेश्वर अशी होती. त्यात नशीबानं साईटसिईंग नव्हतं. मी पर्वणी साधली. कोल्हापूरच्या गोखलेवहिनी बरोबर यायला तयार झाल्या. एकूण ४ रात्री ५ दिवस अशी आटोक्यातली यात्रा होती.
यात माझे दोन ज्योतिर्लिंग होणार होते.
झटपट तयारी करून आम्ही निघालो.
सुरुवातीला शनिवारी ओंकारेश्वर ममलेश्वराचे दर्शन झाले. (या विषयी अधिक ज्योतिर्लिगाच्या लिंकवर वाचावे.)
----------------------------------
दुसर्‍या दिवशी नागपंचमीला आम्ही उज्जैनच्या दिशेने जायला निघालो.
वाटेत पाऊस होता. पहिला काही घाटाचा भाग गेल्यावर सरळ रस्ता होता. वाटेत ओंकारेश्वर-महाकाळेश्वर कावडयात्रा करणारे यात्री भेटले. भगवा पोशाख केलेले, सजवलेले मटके दांडीला बांधून एकामागोमाग एक "बम बम भोले" चा गजर करीत चाललेले. ते श्रीनर्मदामाईचं पाणी कावडीत भरून श्रीमहाकालेश्वरावर अर्पण करतात व श्रीक्षिप्रेचं पाणी आणून श्रीओंकारेश्वरावर अर्पण करतात.

वाटेतली गाव परिचित नावाची होती. मध्यप्रदेश अगदी साधं शेतीप्रधान व देवभीरु वाटलं. वाटेत कितीतरी ठिकाणी श्रीनर्मदामाईनं दर्शन दिलं. आम्ही तिच्या नावाने जयजयकार करीत होतो. बसमध्ये माझा रामनामाचा जप चालूच होता.

उज्जैनमध्ये आम्हाला पोचायला दुपार झाली. एका यात्री निवासात उतरलो. हा निवास श्रीरामघाटाजवळ होता. हा प्राचीन घाट श्रीरामाच्या वास्तव्याची व त्याच्या नदीपूजनाची आणि त्याच्या शिवार्चनेची खूण आहे.

यात्रीनिवासात ४-५ जणी/जणांना मिळून कॉमन रुम दिल्या गेल्या. भोजन व विश्रांती झाली.

त्या दिवशी नागपंचमी होती. या एकाच दिवशी महांकालेश्वराच्या वरच्या मजल्यावरच्या नागेश्वराचं मंदिर उघडतं. लाखो लोक दर्शनासाठी बारीत उभे होते.

आम्ही त्यात वेळ न देता त्या दिवशी उज्जैनमधील इतर काही ठिकाणं पाहण्याचं ठरवलं. बसने आम्ही निघालो. क्षिप्रेवरच्या अनेक पुलांवरून जाताना नुकत्याच आलेल्या महापुराने घातलेल्या दंग्याच्या खुणा आम्हाला दिसल्या. हा पूर मी टीव्हीवर पाहिला होता. पुलाच्या दोन्ही बाजूला प्रचंड चिखल होता. त्यातून वाहने कशीबशी वाट काढत होती. नदीच्या पात्राच्या किनार्‍याला प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच झुडुपांना अडकलेला होता.

नगरदर्शनामध्ये आम्ही प्रथम या नगरीच्या राजाचा विक्रमादित्याचा मोठा पुतळा पाहिला.

आणि म्हटलं की हे सर्व प्रत्यक्ष असूनही आपल्याला ते कल्पित वाटलं ही भारतीय इतिहासाची शोकांतिका आहे. मी मनातल्या मनात राजाची क्षमा मागितली.
त्याने पुजिलेल्या श्रीहरसिध्दीमातेचं मंदिर मी पाहिलं. हे सतीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.

मी मातेची भक्तिभावाने ओटी भरली. नंतर आम्ही बडा गणेश, पंचमुखी हनुमान इ. मंदिरे पाहिली. दोन्ही मूर्ती आधुनिक आहेत.

द्वापरयुगातील ऋषी सांदिपनी जे श्रीकृष्ण व बलराम यांचे गुरु होते त्यांचा आश्रम पाहिला. तेथील बलरामकृष्णांच्या मूर्ती गोड आहेत. त्या परिसरात आपोआप उगवून आलेले शेकडो चंदनवृक्ष आहेत. एक तीर्थ आहे. येथे ५६ दिवसात सर्व विद्या श्रीकृष्णाने संपादन केली होती. त्यांची चरण धूलि लागलेल्या या मोक्षपुरीत आल्यानं मला फार बरं वाटलं.

नंतर आम्ही महाकवी कालिदासाने पुजिलेल्या कालिकामातेचं दर्शन घेतलं.

उज्जैन म्हणल्यावर ज्या देवतेची चर्चा नेहेमी ऐकायला मिळते त्या प्रसिध्द श्रीकालभैरवाचं दर्शन आम्ही घेतलं. या देवतेला नैवेद्य म्हणून बरेचजण दारु एका मातीच्या पसरट भांड्यात विकत घेऊन आत जात होते व देवतेला अर्पण करीत होते. त्यावरच्या कथा आमचा गाईड रंगात येऊन सांगत होता.
हा क्षेत्रपाल आहे. महादेवाच्या क्षेत्राचे रक्षण हा करतो. जसे काशीला कालभैरवाचे स्थान व महत्व आहे. स्वामीच्या दर्शनाआधी याचे दर्शन घेण्याची त्याची अनुमती घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुख्य स्वामीचे दर्शन विनासायास होते.
मी दर्शन घेऊन बाहेर आले.

मग आम्ही श्रीमंगलनाथाचं दर्शन घेतलं. उज्जैन हे नाभिक्षेत्र मानलं जातं. येथून कर्कवृत्त जातं. या भागातून मंगळ या ग्रहाचा जन्म झाला आहे असं आपली शास्त्रे मानतात. येथे एक शिवलिंग आहे. ज्यांना मंगळ असतो ते येथे यथाशक्ती दान करतात. मी व अनेकजणांनीही केले. येथे दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. मी ही दाखवला. अशी काही स्थानं भारतात पाहून खरच खूप आश्चर्य वाटतं. पुराणकालापासून यांची जपणूक केल्यानं बरही वाटतं.

हा चिंतामण गणेश -पुरातन मूर्ती.

ही गोपालकृष्णाची मूर्ती. हरिहर सर्व ठिकाणी एकत्र सापडतात. दोघांची पालखी एकमेकांकडे नेली जाते.

हा सिध्दवट प्रयागक्षेत्राच्या अक्षयवटासारखेच याचे महत्व आहे..

पुरातन कालच्या वेधशाळेलाही लांबूनच पाहिले.

उन्हात इतकी देवळं बघून एकतर थकलो होतो. उद्या पहाटे उठून श्रीमहाकालेश्वराच्या दर्शनाचे वेध लागले होते. रात्रीचं जेवण उरकून उद्याची तयारी करून गजर लावून आम्ही पाचजणी झोपलो.

दुसर्‍या दिवशी पहाटे ३ ला उठून आवरून ५ वा. सूर्योदयापूर्वीच श्रीमहांकालेश्वराच्या दर्शनाच्या बारीत उभे राहिलो. येथे चांगलीच शिस्त, स्वच्छता, पोलिस संरक्षण दिसून आलं.

रांगेतून पुढे सरकत मेटल डिटेक्टरमधून जात उताराच्या वाटेने जवळजवळ तीन तास गेल्यावर अखेर श्रीमहाकालेश्वरापाशी उभे राहिलो. मध्ये काचेचा पडदा होता पण दर्शन अगदी निवांत व्यवस्थित पोटभर झालं. ढकलाढकली नाही घाई नाही कोणी हाकलायला नाही. पिंडीवर दुधाची सतत धार होती. ऐन श्रावणी सोमवारी मध्य प्रदेशमध्ये पहाटेपासून उपाशी रांगेत मी उभी होते हेही मी विसरले. खरच देवाचं मनोभावे घेतलेलं दर्शन, त्याचा अमृतनेत्रस्पर्श सगळे शीण घालवतो हे मी साक्षात‌ अनुभवलं. डोळ्य़ाला पाणी आलं. थोड्या वेळानं मी आमच्या सहयात्रींकडे पाहिले तेही गुंग झाले होते. मोबाईलच्या कॅमेरामध्ये देवाची छ्बी साठवत होते, कोणाचेच पाय उचलेनात. तिथून जावसं वाटेना. कशी अशी ही जादू भगवंत करतो?

देवापुढच्या नंदीदेवाचा मला हेवा वाटला. याला किती सुख आहे. समोरच स्वामी. कुठं जायला नको कुठं यायला नको.

मग आम्ही बाहेर आलो. तिथे असलेली काही मंदिरं पाहिली. कोटीतीर्थ पाहिलं. खरंतर मुख्य देवाची छबी डोळ्य़ापुढे असताना आता काही बघावसं वाटत नव्हतं.
मी प्रसाद घेतला. आवाराच्या बाहेर आले. चपला शोधल्या. मजेत चालत चालत यात्रीनिवासात मी आले.
आल्यावर सगळ्यांचा भरगच्च फराळ झाला. बॅगा भरल्या.

मन प्रसन्न झालं होतं. काही बोलावसं वाटत नव्हतं. मी व एक महिला यात्री बाहेर पडलो. जवळच्या गोरखपूर प्रेसच्या दुकानातून श्रीमहाप्रभू चैतन्यांच्या चरित्राचं पुस्तक घेतलं.
सर्वात शेवटी ज्या राममंदिरापाशी आम्ही उतरलो होतो ते मंदिर बघायला गेलो.

अतिशय स्वच्छ मंदिर होते. आत श्रीरामसीतेच्या सुरेख मूर्ती होत्या. इथेही रामरायानं "मी तुझ्या जवळ आहे", ही साक्ष अचानक मला दिल्यानं मला भरुन आलं. जसं हरिद्वारला आपण रामघाटापाशी उतरलो आहोत हे सर्वात शेवटी कळले तसंच इथेही झालं. बर झालं आपण बाकीच्या यात्रेकरुंच्या ओळखपरेड मध्ये सापडलो नाही ते असं मला वाटून गेलं.

कित्येको लक्ष वर्षांपूर्वी श्रीरामराय या क्षिप्रेकाठी उतरले होते. राहिले होते, क्षिप्रेकाठी त्यांनी पितरांचं तर्पण केलं होतं. त्यांची चरणधुली लागलेली ही मोक्षपुरी सोडायची वेळ जवळ आली.

मोठ्या टमटममधून आम्ही उज्जैन स्थानकाकडे रवाना झालो. तिथे गाडी यायला बराच वेळ होता. यथावकाश ट्रेन आली. तिने दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही पुण्याला पोचलो. भर पावसाळ्य़ात यात्रा केल्याचा प्रसाद म्हणून २ दिवस ताप येऊन गेला. मनात मात्र ११ ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण केल्याचं समाधान होतं.
आता वेध लागले होते शेवटच्या ज्योतिर्लिंगाचे - श्रीमल्लिकार्जुनाचे. आणि अजून एका मोक्षपुरीचे श्रीजगन्नाथपुरीचे.

॥श्रीराम समर्थ॥